महायुतीच्या उमेदवाराचा सातारा दौरा, पण शंभुराज देसाईंची भेट घेणं टाळलं; पडद्याआड नेमकं चाललंय काय?
Smita Jadhav On Shambhuraj Desai: साताऱ्यात महायुतीमधील नाराजीनाट्य दिसून आले आहे. महायुतीच्या उमेदवाराने एकनाथ शिंदेंच्या खास नेत्याची भेट घेण्याचे टाळल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील ५ जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील जागेवरून महायुतीमध्ये अंतर्गत फूट पाहायला मिळाली आहे. एकनाथ शिंदेंनी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे. यानंतर महायुतीमध्ये अंतर्गत धूसफूस पाहायला मिळत आहे. याचे पडसाद आज साताऱ्यात पाहायला मिळाले आहे. डॉ. स्मिता जाधव यांचा शंभूराज देसाई यांच्याशी भेटीचा टाळाटाळीचा प्रकार समोर समोर आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात महायुतीमधील अंतर्गत समन्वयाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव या सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेण्याचे टाळले. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. दौऱ्यात शंभुराज देसाई यांच्या भेटीचा उल्लेख असतानाही प्रत्यक्ष भेट झाली नसल्याची माहिती समोर आले आहे.
डॉ. स्मिता जाधव यांनी आपल्या सातारा दौऱ्यात भाजपचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मकरंद पाटील यांची भेट घेतली. मात्र महायुतीतील महत्त्वाचे नेते असलेल्या शंभूराज देसाई यांच्याशी त्यांची भेट झाली नाही. शंभुराज देसाई हे सांगलीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे. त्यामुळे स्मिता जाधव यांच्या दौऱ्यात शंभुराज देसाई यांची भेट का झाली नाही, याबाबत राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.
याआधी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिंदेसेनेने पाठिंबा दिल्यानंतर महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत चर्चा रंगली होती. आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही महायुतीतील नेत्यांच्या भेटीगाठी आणि पाठिंब्याच्या भूमिकांमुळे अंतर्गत मतभेद असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुतीतील घटक पक्षांमध्ये निवडणुकीच्या रणनीतीवर एकमत आहे का, तसेच स्थानिक पातळीवर समन्वय कसा राखला जात आहे, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. डॉ. स्मिता जाधव आणि शंभूराज देसाई यांची भेट न झाल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या घटनेवरून महायुतीत प्रत्यक्षात धुसफूस आहे की हा केवळ दौऱ्याच्या नियोजनाचा भाग होता, हे स्पष्ट होण्यासाठी संबंधित नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.