
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार लढत दिली आणि विजयही मिळवला. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून महायुतीमधील सर्वच पक्षांकडून जय्यत तयारीला सुरूवात झाली आहे. सध्या राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असली तरी महायुतीमधील तीन प्रमुख पक्षांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कुरघोडी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. कारण भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये एकमेकांना शह-काटशहचे राजकारण जोरात सुरू आहे.
ठाणे जिल्ह्यात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकहाती वर्चस्व आहे. पण शिंदे यांच्या आधीपासूनच ठाण्याच्या राजकारणात सक्रिय असणारे भाजप नेते गणेश नाईक यांचंही एकेकाळी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात राजकीय वर्चस्व होतं. सध्या त्याच ठाण्यात शिंदे विरुद्ध नाईक असा वाद हा पेटलेला दिसत आहे. एवढंच नव्हे तर या दोघांमधला हा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारापर्यंत येऊन पोहचला आहे. त्यामुळे एकमेकांना धोबीपछाड देण्याकरिता शिंदे आणि नाईक काही ना काही तरी युक्त्या करत असतात.
नाईक यांच्या गडात सुरूंग लावण्यासाठी शिंदे सज्ज
महापालिका निवडणुकीत मुंबईत आम्ही महायुती म्हणून लढू , पण ठाण्यात युती होईल असं वाटतं नाही असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. ठाण्यात शिंदेंचा शिवसेना पक्ष आणि भाजप वेगवेगळे लढतील, असं चित्र दिसत आहे. त्यामुळे आगामी ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप विरोधात शिंदेची शिवसेना असा सामना होण्याची शक्यता आहे, कारण नाईक विरुद्ध शिंदे हा वाद आहे. याच पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांच्या नवी मुंबई महापालिकेच्या गडात सुरुंग लावण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी देखील आता कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांना शिवसेनेच्या गळाला लावलं आहे. अंकुश कदम हे नाव मराठा आरक्षणच्या चळवळी मधे सर्व परिचित असं नाव आहे, त्यांना “बाबा” या नावाने ओळखलं जात.
अंकुश कदम यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक ही स्वराज्य पक्षाकडून भाजप नेते गणेश नाईक यांच्या विरुद्ध ऐरोली मतदार संघातून लढवली होती पण या निवडणुकीत त्यांना अपयश आलं. मात्र या अपयशातून न खचता त्यांनी आपला दांडगा जनसंपर्क हा संपूर्ण नवी मुंबई मधे कायम ठेवला आणि मराठा आरक्षणच्या लढाईमध्ये अलीकडे ते पूर्ण ताकदीने उतरले. अंकुश कदम यांची लोकप्रियता ही तरुणांमधे मोठ्या प्रमाणात आहे, कारण ते नेहमी प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई लढत आले आहेत. शिवाय सातारा जिल्ह्यातील मातीचा हा तरुण आहे, त्यामुळे लढण्याची कला त्यांना जन्मापासून उपजत आहे.
शिंदे नाईकांना धोबीपछाड देणार का ?
हेच सर्व गुण लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी अंकुश कदम यांना आपल्या गळाला लावलं आहे, आण ते कदम यांचा, त्यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करून घेत आहेत. 27 सप्टेंबर, म्हणजे आजच नवी मुंबई मधील विष्णुदास भावे नाट्यगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. पण या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध नाईक असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र आता अंकुश कदम हे शिंदेंच्या बाजूने लढणार आहेत, त्यामुळे आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे हे नाईकांना धोबीपछाड देणार का हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.