छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई; 12 हॉटेल्ससह आस्थापनांचे परवाने निलंबित
छत्रपती संभाजीनगरमध्ये अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झालेलं समोर आलं आहे. यामध्ये ब्लिंकिट स्टोअर, हॉटेल्स, डेअरी आणि कॅन्टीनचा समावेश आहे. 15 दिवसांत त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. अस्वच्छता, अन्न साठवणुकीतील निष्काळजीपणा आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या एकूण 12 आस्थापनांचे परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्रे तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आली आहेत. ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, मिठाई दुकाने, डेअरी तसेच ऑनलाइन डार्क स्टोअरची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाने संबंधित 12 आस्थापनांवर परवाने निलंबित करण्याची कठोर कारवाई केली.
या कारवाईत ब्लिंकिट स्टोअर, एमआयटी कॅन्टीन, हॉटेल न्यू राज दरबार, राजदरबार मराठा हॉटेल, श्री हरी दूध डेअरी अँड बेकर्स, रॉयल हॉटेल, केजीएन केटरर्स, एस. के. सवेरा हॉटेल, जयश्री फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट, टेके फरसाण अँड बाबा मिसळ पाव सेंटर, श्री चामुंडा बिकानेर स्वीट आणि एंड्युरन्स टेक्नॉलॉजीज कंपनीच्या कॅन्टीनचा समावेश आहे.
तपासणीत आढळल्या गंभीर त्रुटी
तपासणीदरम्यान काही आस्थापनांमध्ये अन्न आणि अखाद्य पदार्थ एकत्र साठवले जात असल्याचे आढळले. तसेच कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, शाकाहारी व मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसणे, स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कीडनियंत्रणाचा अभाव आणि अन्न साठवणुकीसाठी आवश्यक तापमानाचे निकष न पाळणे अशा त्रुटी निदर्शनास आल्या.
15 दिवसांची मुदत; लेखी आदेशानंतरच व्यवसाय सुरू होणार
प्रशासनाने संबंधित सर्व 12 आस्थापनांना अन्न तयार करणे, विक्री करणे आणि वितरण तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांनुसार आवश्यक सुधारणा आणि त्रुटींची पूर्तता करण्यासाठी व्यावसायिकांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीनंतर प्रशासनाकडून फेरतपासणी केली जाणार आहे. तपासणीत समाधानकारक सुधारणा आढळल्यानंतर आणि सक्षम प्राधिकाऱ्यांचे लेखी आदेश मिळाल्यानंतरच संबंधित आस्थापनांना पुन्हा व्यवसाय सुरू करता येणार आहे.
सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी या कारवाईची माहिती दिली. अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, वर्षा रोडे आणि प्रशांत अजिंठेकर यांच्या तपासणी अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी प्रशासनाने ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे संकेत दिले आहेत.