मालेगाव पालिकेतील टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण आता थेट काचेच्या फ्रेममध्ये…शान ए हिंद यांनी नेमकं काय केलं?
सण-उत्सवांच्या काळात शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी दालन बंद ठेवण्यात आले होते, असा खुलासा शान-ए-हिंद यांनी केला आहे.

Nashik Malegaon Tipu Sultan Photo : मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांचे दालन तब्बल महिन्यानंतर पुन्हा खुले झाले आहे. टिपू सुलतान यांच्या छायाचित्रावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या लेखी सूचनेनुसार दालनातील टिपू सुलतान यांचा फोटो आता हटवण्यात आला आहे. यानंतर उपमहापौरांनी आपल्या टेबलवर संविधानाची मूळ प्रत काचेच्या बॉक्समध्ये फ्रेम करून ठेवली आहे.
महिन्याभराने दालन उघडण्यात आले
सण-उत्सवांच्या काळात शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी दालन बंद ठेवण्यात आले होते, असा खुलासा शान-ए-हिंद यांनी केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी टिपू सुलतान यांचा फोटो हटवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
थेट कोर्टात याचिका दाखल
उपमहापौरांच्या दालनात साथी निहाल अहमद, अबू आझमी आणि अखिलेश यादव यांचेही फोटो लावण्यात आले आहेत. दरम्यान, टिपू सुलतान यांचा फोटो दालनात लावावा किंवा नाही याबाबत उपमहापौर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर अद्याप सुनावणी सुरू झालेली नाही. या प्रकरणात न्यायालयाने राज्य सरकार, पोलीस, महापालिकेला उत्तर मागितले आहे.
नेमका वाद काय झाला?
मालेगावच्या महापालिकेत पुन्हा एकदा टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याचे ऑगस्ट महिन्यात समोर आले होते. त्यामुळे शहरात वातावरण तापले होते. पमहापौर शान-ए-हिंद यांनी 25 ऑगस्ट 2026 रोजी त्यांच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयात प्रवेश केला होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतरही महापुरुषांचे फोटो लावण्यात आले होते. या महापुरूषांसोबत टिपू सुलतान यांचाही फोटो लावण्यात आला होता. त्यानंतर नवा वाद समोर आला होता.
प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष
दरम्यान, आता उपमहापौर शान-ए-हिंद यांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत राज्य सरकार, महापालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार का? सोबतच त्यांनी काचेच्या फ्रेममध्ये ठेवलेल्या भारतीय संविधानावरही कोणी आक्षेप घेणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.