…तर राज्यकर्त्यांना घरात घुसून मारीन, पल्लवी जरांगे पाटील हिची थेट धमकी

manoj jarange patil | मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण नवव्या दिवशी सुरु आहे. त्यांनी आता जलत्यागही केला आहे. परंतु राज्य सरकारकडून अजूनही मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय अस्वस्थ झाले आहे. जरांगे पाटील यांच्या मुलीने थेट धमकीच दिली आहे.

...तर राज्यकर्त्यांना घरात घुसून मारीन, पल्लवी जरांगे पाटील हिची थेट धमकी
pallavi jarange patil
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 02, 2023 | 4:28 PM

अभिजित पोते, बीड | 2 नोव्हेंबर 2023 : राज्यात मराठा आंदोलन उग्र झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर अनेक ठिकाणी तोडफोड आणि हिंसाचाराच्या बातम्या आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. त्यानंतर सरकारकडून आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी त्यांच्या कुटुंबियांनाही वाटत आहे. मनोज जरांगे पाटील यांची कन्या पल्लवी हिने वडिलांना काही झाले तर राज्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना मारीन, अशी थेट धमकीच दिली आहे. सर्व पुरावे मराठवाड्यात असताना समितीचे काय काम? असा सवालही उपस्थित केला आहे.

काय म्हणाली पल्लवी

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ४९ जणांचा बळी गेला आहे. मग काय माझ्या वडिलांचा जीव गेल्यावर आरक्षण देणार आहात का? माझ्या वडिलांना काही झाले तर या सरकारला जागेवर ठेवणार नाही. अख्खा मराठा समाज सोबत घेऊन राज्यकर्त्यांच्या घरात शिरुन त्यांना मारीन. एवढी हिंमत माझ्यात त्यांची मुलगी म्हणून आहे. मराठा, कुणबीसंदर्भातील सर्व पुरावे मराठवाड्यात आहे. मग या समितीचे काय काम? यापूर्वी सरकारने ३० दिवस मागितले होते. परंतु माझ्या वडिलांनी ४० दिवस दिले. त्या दिवसांत सरकारने काय केले? आता पुन्हा कशासाठी मुदत हवी आहे. आता काही कारणे देऊ नका, सरळ आरक्षण द्या, अशी मागणी पल्लवी हिने केली.

मराठा समाजाने उग्र आंदोनल करु नये

मराठा समाज शिस्तबद्ध समाज आहे. वडिलांनी सांगितले आहे, आपणास लोकशाही पद्धतीने आरक्षण घ्यायचे आहे. यामुळे कुठेही उग्र आंदोलन करु नका. आत्महत्या तर कोणीही करु नका. मी पप्पांनाही म्हणते, तुम्ही आंदोलन करा, पण आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. मागच्या वेळेस सरकारने विश्वासघात केला. हे लक्षात ठेवा. सरकारने आता सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन हा विषय संपवा. मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल होत आहे, त्यावर बोलताना पल्लावी म्हणाली की, मराठ्यांकडून चूक झाली तर त्यांना लगेच दिसते. परंतु सरकारकडून होणाऱ्या चुकांवर पांघरुन टाकले जात आहे. मागील वेळेस पोलिसांकडून लाठीचार्ज केला होता, त्यासंदर्भात अजून काही कारवाई नसल्याचे तिने लक्षात आणून दिले.

मनोज जरांगे पाटील यांचे वडील म्हणतात….

आमची हात जोडून विनंती आहे, तुम्ही आरक्षण द्या. माझ्या नवरा आठ दिवसांपासून अन्नपाणी न घेता बसला आहे. परंतु सरकारला काहीच घेणे देणे नाही. तुम्ही दोन दिवस अन्नपाण्याविना राहून दाखवा, असे आव्हान डोळ्यात अश्रू आणून मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीने राज्यकर्त्यांना दिले.