मनोज जरांगे उद्यापासून घराबाहेर पडणार, मार्ग ठरले, या भागात जाऊन… मोठा निर्णय काय?

मराठा आंदोलनामुळे आपल्या पदरात आरक्षण पडत आहे. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. सगळ्यांना घराच्या बाहेर पडावे लागेल. तरच आपल्याला न्याय मिळणार आहे, असे मनोज जरांगेंनी म्हटले.

मनोज जरांगे उद्यापासून घराबाहेर पडणार, मार्ग ठरले, या भागात जाऊन... मोठा निर्णय काय?
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Jul 05, 2024 | 12:38 PM

Manoj Jarange Patil Maratha Reservation Rally : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. मराठा आंदोलनाचा चेहरा असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पावित्रा घेतला आहे. मनोज जरांगे पाटील उद्यापासून घराबाहेर पडणार आहेत. यासाठी त्यांनी काही विशिष्ट मार्गही ठरवले आहेत. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घराच्या बाहेर पडाव लागेल, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढणार आहे. शनिवारी 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ही जनजागृती रॅली काढणार आहे. ही रॅली राज्यभरात टप्प्याटप्याने घेतली जाणार आहे. या जनजागृती रॅलीच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश या ठिकाणी रॅली काढली जाणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

कोणत्याही कार्यक्रमात बदल होणार नाही

जनजागृती रॅली हे शक्तिप्रदर्शन नाही. तसेच हा निवडणुकीचा विषय नाही. आम्ही आमच्या मागण्यासाठी एकत्र येत आहोत. सध्या कामाचे दिवस आहेत, मात्र जे आहेत ते समाज बांधव एकत्र येतील. कोणत्याही कार्यक्रमात बदल होणार नाही. ठरल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम होतील, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

माझी मराठा समाजाला विनंती आहे की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागेल. तसेच वारंवार रस्त्यावर एकत्र यावं लागेल. येत्या 13 तारखेला आमच्या व्याख्येप्रमाणे संगेसोयरे यावर सरकार शंभर टक्के निर्णय घेईल. हैद्राबाद गॅझेट लागू होईल. तर सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा पण जीआर लागू होईल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठा आता निर्णायक झाला आहे

मराठा आंदोलनामुळे आपल्या पदरात आरक्षण पडत आहे. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. सगळ्यांना घराच्या बाहेर पडावे लागेल. तरच आपल्याला न्याय मिळणार आहे. मराठा आता निर्णायक झाला आहे. कोणी आपल्या पक्षाकडे बघून समाजाची हानी होणार नाही याची काळजी घ्या. मराठा आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्याला मराठा आमदारांनी त्याला ताकद देऊ नये. आपल्याच तरुणांना जाळाच्या खाईत लोटू नका, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

सध्या काही न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहेत. त्या न्यायालयीन प्रक्रियावर मी बोलणार नाही. न्याय देवता मराठा समाजाला न्याय देईल, असेही मनोज जरांगेंनी सांगितले.