
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे 27 ऑगस्टला हजारो मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना होणार आहे. मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून ते बेमुदत आंदोलन करणार आहेत. मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याची तयारी जोरात सुरु आहे. ठिकठिकाणी आंदोलकांना नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर आंदोलकांची लगबग सुरू झाली आहे. अंतरवाली सराटी जवळील साष्ट पिंपळगाव येथे सरपंच आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलकांच्या नाश्त्या पाण्यासाठी गरमा गरम पालक पुऱ्यांची आणि चटणीची सोय करण्यात आली आहे. आजपासून ही तयारी सुरू झाली असून मुंबई मार्गावर जाणाऱ्या सर्व आंदोलकाना निघताना या नाश्त्याचा आस्वाद घेता येणार आहे. स्थानिक नागरिक आणि सरपंचांनी आचारी लावून ही सोय केली आहे. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी आणि रस्त्यातही आंदोलकांना नाश्ता आणि जेवण देण्यात येणार आहे.
29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी धाराशिव जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठी तयारी केली आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या आंतरवालीकडे मराठा कार्यकर्ते रवाना होणार आहेत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार यावेळी आंदोलकांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याचा मार्ग सांगितला आहे. 27 तारखेला आंतरवाली सराटी मधून आम्ही बाहेर पडणार आहोत पैठण, शेवगाव, पांढरीपुल, अहिल्यानगर, आळेफाटा आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम शिवनेरी किल्ल्यावर राहील. 26 तारखेच्या आत अंमलबजावणी केली तर ठीक आहे, अन्यथा एकदा अंतरवाली सराटी सोडली तर नंतर चर्चा करणार नाही. थेट मुंबईमध्ये गेल्यावर चर्चा करू असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये, फक्त त्यांना काहीतरी कुरापती उकरून काढायच्या आहेत. आरक्षण द्यायची वेळ आली तर आता फडणवीस आईला पुढे करत आहे. त्यांच्या आईला काही शब्द बोललो असेल तर ते मी ते विधान मागे घेतलेले आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, मुंबईत येऊ द्यायचं नाही.’