Manoj Jarange: सुपाऱ्या तुम्ही घ्यायला लागलात, आम्ही नाही! योगेश कदमांवर जरांगे पाटलांचा घणाघात; मराठा समाजाची ताकदही दाखवून दिली
Manoj Jarange Warns Eknath Shinde: मनोज जरांगेंनी योगेश कदम आणि रामदास कदमांना इशारा दिला आहे. तसेच त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री आणि नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि रामदास कदम यांच्यावर टीका करताना जरांगे यांनी शिंदे यांना बदनाम करण्याचे काम आपण करत नसून त्यांच्याच गटातील काही मंत्री आणि आमदार त्यांना अडचणीत आणत असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच, या प्रकरणात आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा करत त्यांनी योग्य वेळी त्याचा खुलासा करण्याचा इशाराही दिला.
योगेश कदम यांच्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला कोणता निर्णय समाजाच्या हिताचा आहे आणि कोणता नाही, हे चांगलेच कळते. आपण एकनाथ शिंदे यांना बदनाम करायचे असते, तर त्यांना एवढ्या उंचीवर नेले नसते. मात्र आता काही जण सुपाऱ्या घेऊन काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘तुम्ही तुमची जात संपवायला निघालात, तुम्ही सुपाऱ्या घेतल्या, आम्ही नाही,’ अशा शब्दांत त्यांनी योगेश कदम यांच्यावर टीका केली.
एकनाथ शिंदे यांना मोठे करणारा वर्ग मराठा समाजच असल्याचे सांगत, त्यांच्यापासून समाज दूर गेल्यास त्याचे परिणाम शिंदे यांना भोगावे लागतील, असा इशाराही जरांगे यांनी दिला. रामदास कदम यांच्यावर टीका करताना जरांगे यांनी ऑडिओ क्लिप प्रकरणात ‘जोशी’ नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला. आपण पत्रकार परिषद घेण्यापूर्वी दोन दिवस आधी ही क्लिप संबंधित व्यक्तीकडे कशी पोहोचली, याची माहिती घेतल्याचा दावा त्यांनी केला.
रामदास कदम यांनी क्लिप मिळाल्यानंतर ती एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जोशी नावाच्या व्यक्तीला फोन केला होता, असा आरोपही त्यांनी केला. क्लिप देणारी व्यक्ती आणि रामदास कदम यांना क्लिप देणारी व्यक्ती एकच असण्याची शक्यता असल्याचे जरांगे म्हणाले. या संदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला. ‘रामदास भाईंनी जोशी नावाच्या व्यक्तीला फोन केला होता की नाही, हे त्यांनी सांगावे. मी पत्रकार परिषद घेऊन पुरावे देण्यास तयार आहे,’ असे आव्हान जरांगे यांनी दिले.
तसेच, या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली. एकनाथ शिंदे यांना 2029 मध्ये राजकीय फटका बसल्यास त्याला त्यांच्या गटातील काही मंत्री आणि आमदार जबाबदार असतील, असा दावा जरांगे यांनी केला. ‘तुम्ही जितके खोलात जाल, तितका मीही या प्रकरणाचा पाठपुरावा करेन. मी अजून संयम धरला आहे,’ असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे जरांगे यांच्या या आरोपांवर योगेश कदम, रामदास कदम आणि एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.