‘मातोश्री’ बाहेर ठोक मोर्चा, मनोज जरांगे म्हणाले ते आमचे नाहीत

मराठा क्रांती ठोक मोर्चानं उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीकडे मोर्चा वळवला. काही वेळ आंदोलन केल्यानंतर रमेश केरे पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र आमचं असं कोणतंही आंदोलन सुरु नसून केरे पाटलांच्या आंदोलनाशी संबंध नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे

मातोश्री बाहेर ठोक मोर्चा, मनोज जरांगे म्हणाले ते आमचे नाहीत
| Updated on: Jul 30, 2024 | 9:42 PM

मराठा आरक्षणावरुन उद्धव ठाकरेंची भूमिका काय ?, हे विचारण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील मातोश्री परिसरात धडकले. त्यावरुन अंबादास दानवे आणि रमेश केरे पाटील आमने-समाने आले. भाजपच्या सांगण्यावरुन आले का ?, असा सवालही दानवेंनी केरे पाटलांना केला. रमेश केरे पाटलांसोबत मराठा आंदोलक मातोश्रीच्या परिसरात जमले. त्यामुळं पोलिसांचा फौजफाटाही तैनात होताच.
अखेर केरे पाटलांसह 4-5 जणांना मातोश्रीत प्रवेश देण्यात आला आणि मराठा आंदोलकांसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. सर्व समाजाच्या नेत्यांना बोलावून सर्वमान्य तोडगा सरकारनं काढावा, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांसमोर मांडली.

रमेश केरे पाटील मराठा आंदोलकांसह मातोश्री परिसरात आले. मात्र हे मराठ्यांचं आंदोलन नाही, सध्या मराठ्यांचं कुठंही आंदोलन नाही. तर दरेकरांनीच असे बुडबुडे उभे केल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे.

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका घेण्यापेक्षा, मराठा आरक्षणावर सर्व समाजाच्या नेत्यांची बैठक घेवून तोडगा काढा,असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. हीच भूमिका 2 दिवसांआधी शरद पवारांनीही मांडली आहे. तर उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी, जरांगे पाटलांची आहे. त्यावरुनच फडणवीसांनीही महाविकास आघाडीची यावर भूमिका काय ? असा सवाल केला आणि आता तोच, सवाल करत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे केरे पाटीलही उद्धव ठाकरे यांच्याकडे आले.

मराठा समाजाला आरक्षण भेटाव यासाठी लढा देणारे जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीमध्ये तब्येत खालवली आहे, त्यांचा यावेळी बीपी नॉर्मल नसल्याने त्यांना थकवा जाणवत आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील यांच्यावर अंतरवाली सराटी मध्येच वैद्यकीय उपचार करण्यात येत आहे. जर बीपी नॉर्मल झाला नाही तर त्यांना संभाजीनगरला हलवावे लागेल असं डॉक्टरांचे म्हणणं आहे.