
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबईत उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विजय झाला आहे. अखेर काल सरकारकडून एक जीआर काढण्यात आला. यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती पडताच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मनोज जरांगेनी उपोषण सोडल्यानंतर त्यांना लगेचच पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती नाजूक झाली आहे. आता डॉक्टरांनी त्यांना पुढील पंधरा दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून परतल्यानंतर रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांना थेट रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची संपूर्ण तपासणी केली आहे. दीर्घकाळ उपवास केल्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्तातील साखर, रक्तदाब तपासण्यात आले. त्यासोबतच इतर अनेक महत्त्वाच्या तपासण्याही करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची स्थिती नाजूक असल्याचे सांगितले आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे मराठा समाजामध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. पण आता त्यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचं आश्वासन यावेळी मनोज जरांगे पाटील यांना दिलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं जरांगे यांनी जाहीर केलं.
रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे त्यांच्या शरीरावर खूप ताण आला आहे. त्यांची ताकद कमी झाली आहे. तसेच त्यांच्या शरीराला लागणारी पोषक तत्त्वेही घटली आहेत. त्यामुळेच, त्यांना पूर्णपणे वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन आठवड्यांसाठी कोणताही प्रवास किंवा सार्वजनिक कार्यक्रम करु नका, असा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांची तज्ज्ञ टीम त्यांच्यावर उपचार करेल. यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ते आराम करतील.
मराठा आंदोलनाचे नेते असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता ते उपोषण मागे घेतल्यामुळे सरकार आणि मराठा समाज दोघांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. अखेर त्यांचा विजय झाला असून याचा सर्वाधिक लाभ गरीब आणि गरजू मराठ्यांना होणार आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक केले जात आहे.