
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला आहे. येत्या २९ ऑगस्टला मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले. फडणवीस मुद्दाम हे करत आहेत आणि ही एकप्रकारे खुन्नस आहे. देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाहीये, असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी केला.
यापूर्वीच्या सरकारमध्ये गिरीश महाजन यांनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचे म्हटले होते, पण आता त्यांच्याच सरकारच्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, एक घर, एक गाडी २७ तारखेला निघालीच पाहिजे. मोठ्या संख्येने मराठा समाजाने मुंबईकडे निघायचं आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या या आंदोलनात कीर्तनकार सुद्धा सहभागी होणार आहेत, त्यामुळे हा एक भव्य-दिव्य कार्यक्रम असेल. फडणवीस साहेब तुम्हाला संधी आहे, सोनं करा, असे मनोज जरांगेंनी म्हटले.
आंदोलनादरम्यान मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे सरकारने तातडीने मागे घ्यावेत, अशी आमची प्रमुख मागणी आहे. तसेच, ज्यांनी या आंदोलनात बलिदान दिलं, त्यांच्या कुटुंबांना अद्याप आर्थिक निधी मिळालेला नाही, त्यामुळे ती कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी २६ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर सरकारसुद्धा उलथून टाकू शकतो,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे यांनी मराठा तरुणांना आवाहन केले की आंदोलनादरम्यान कोणत्याही पोलिसाशी वाद घालू नका. पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस. पण जर मुंबईत मराठ्यांच्या पोराला काठीने जरी डावचिले तर पानंद रस्ता सुद्धा मोकळा राहणार नाही. २६ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास २९ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये येणार म्हणजे येणार. मी थांबत नसतो, असंही मनोज जरांगे म्हणाले.
आंतरवाली सोडल्यानंतर सरकारसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. समाजाचं ह्या वेळेस रक्षण करा. कोणत्याही नेत्याला घाबरून घरी न बसता मुंबईला या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.