मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला, जरांगेंना थेट मुख्यमंत्र्यांचा निरोप, आंदोलनाबद्दलची मोठी अपडेट समोर

मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई आंदोलन चर्चेत आहे. ओबीसी समाजाचा याला तीव्र विरोध आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने जरांगे पाटील यांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. बीडमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला, जरांगेंना थेट मुख्यमंत्र्यांचा निरोप, आंदोलनाबद्दलची मोठी अपडेट समोर
Manoj Jarange Patil devendra fadnavis
| Updated on: Aug 26, 2025 | 1:34 PM

मराठा समाजाने एल्गार पुकारत मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. येत्या २९ ऑगस्टला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील चलो मुंबईची हाक दिली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात मराठा आंदोलन हा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजामध्ये सध्या मतभेद वाढत असल्याचे दिसत आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी जातीतून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी समाज या मागणीला तीव्र विरोध करत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील नियोजित आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कर्तव्य अधिकारी राजेंद्र साबळे यांनी त्यांची भेट घेतली आहे.

राजेंद्र साबळे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने राजेंद्र साबळे हे जरांगे पाटलांना भेटले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईचे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या भेटीदरम्यान त्यांनी दोन्ही बाजूंच्या अपेक्षांवर चर्चा केली. तसेच येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये, यासाठी त्यांचा मार्ग जाणून घेण्यासाठी आलो आहे. त्यासोबतच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आंदोलन पुढे ढकलता येईल का, ही विनंती करण्यासाठी आल्याची माहिती राजेंद्र साबळे यांनी दिली.

मराठा समाजाने ५८ लाख कुणबी नोंदींचा अहवाल सरकारकडे सादर केला आहे. या आधारावर त्यांनी सरकारला तात्काळ अंमलबजावणी करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आज रात्री १० वाजेपर्यंत सरकारने ठोस निर्णय घ्या. अन्यथा मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार मनोज जरांगेंनी केला आहे.

ओबीसी समाजाकडून गुन्हा दाखल

चंद्रपूरमध्ये ओबीसी समाजाने जरांगे पाटलांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ‘मनोज जरांगे मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. ओबीसी समाजाने जरांगे पाटलांची मागणी असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. चार वेगवेगळ्या आयोगांनी यापूर्वी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाकारल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळए ओबीसी समाजाने जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

सरकारने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना जरांगे पाटलांसमोर बसवून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण का देता येणार नाही, हे समजावून सांगावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू

दरम्यान बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मराठा, ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी समाजामध्ये शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मुंबईला जाताना कोणत्याही शहरातून न जाता शांततेत कूच केली जाईल, अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे.