Marathi Bhasha Gaurav Diwas : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी… का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन ?

मराठी भाषेचा आज गौरव दिन आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची परंपरा आहे. याविषयी जाणून घेऊया.

Marathi Bhasha Gaurav Diwas : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन ?
मराठी भाषा गौरव दिन
| Edited By: | Updated on: Feb 27, 2026 | 8:28 AM

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…’, कवी सुरेश भट यांच्या या सुंदर ओळी आपल्या मराठी भाषेचा समृद्ध वारसा, वैभव मांडतात. महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या आपल्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन आहे.

मराठी भाषा गौरव दिन

आजचा दिवस म्हणजे 27 फेब्रुवारीला महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन करण्याची परंपरा आहे. कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेची अस्मिता टिकवण्यासाठी तिच्या सन्मासाठी आयुष्यभर अथक प्रयत्न केले, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, मराठी संस्कृती आणि साहित्याचा हा गौरव दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

कुसुमाग्रज यांच्या जयंती आणि मराठी भाषा गौरवदिन
मराठी साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी रोजी जन्मदिवस. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जातो.

राज्यभर विविध कार्यक्रम

कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. मराठी भाषा गौरवदिनाचे निमित्त साधत राज्यभर विविध कार्यक्रम, पुरस्कार सोहळे, कवी संमेलनांचे आयोजन केले जाते.

मराठी राजभाषा दिन म्हणजे काय?

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य बनले. त्याचबरोबर मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्य केले गेले. तेव्हापासून 1 मे हा ‘मराठी राजभाषा दिन’ किंवा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा दिवस, या दोन्हींमधील फरक काय?

‘मराठी भाषा गौरव दिवस’ (27 फेब्रुवारी) आणि ‘मराठी राजभाषा दिवस’ (1 मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.
1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र हे विशेषतः मराठी भाषिकांचे राज्य असल्याने 1 मे दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून सन 1965 पासून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय वसंतराव नाईक सरकारने केला. 27 फेब्रुवारीला महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन करण्याची परंपरा आहे.

मराठीला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा कधी मिळाला?

मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारकडून अधिकृतपणे ‘अभिजात भाषेचा’ (Classical Language) दर्जा प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली, ज्यामुळे प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मराठीला हा प्रतिष्ठित दर्जा मिळाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us