एकमेकांविरोधात लढले, मतमोजणीनंतर घुगे झाले पाटलांचे फॅन! प्रतापसिंह पाटलांच्या विजयामागच्या ‘चाणक्याची’ केली प्रशंसा; पोस्ट चर्चेत

Marathwada Graduate Constituency: मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील पराभूत उमेदवार दिलीप घुगे यांनी विजयी प्रतापसिंह पाटील यांचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टची चर्चा होत आहे.

एकमेकांविरोधात लढले, मतमोजणीनंतर घुगे झाले पाटलांचे फॅन! प्रतापसिंह पाटलांच्या विजयामागच्या चाणक्याची केली प्रशंसा; पोस्ट चर्चेत
| Updated on: Oct 28, 2026 | 4:47 PM

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. यानंतर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयासमोर आमदार संदिप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. यावेळी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. तर दुसरीकडे पराभूत दिलीप घुगे यांच्याकडून विजयी प्रतापसिंह पाटील यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की , आम्ही आमचे नेते शरद पवार यांचे विचार घेऊन जनतेपर्यंत गेलो होतो. आमच्या विरोधात मोठमोठे नेते होते, संस्थानिक होते, सत्ताधारी नेते होते परंतु ही निवडणूक जनतेने हाती घेतली होती, तसेच मनोज दादांचे आशीर्वाद देखील मिळाले त्यामुळे निर्णायक आघाडी मिळाली असल्याची प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली. यानंतर आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात निवडणूक लढवणारे ठाकरे शिवसेनेचे पराभूत उमेदवार दिलीप घुगे यांनी विजयी उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांचं अभिनंदन केलं आहे.

Loading...

डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्यासारखा पदवीधर आमदार होण्यासाठी डॉ. राहुल पाटील यांच्यासारखा चाणक्य, परफेक्ट नियोजन करणारा पाठीराखा भाऊ असावा लागतो, अशी पोस्ट दिलीप घुगे यांनी ट्विटरवर केली आहे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही प्रतिस्पर्धी उमेदवाराचं अभिनंदन करत त्याच्या विजयामागील नियोजनाचं कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीतील राजकीय संघर्षानंतर दिलीप घुगे यांच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची गेल्या 33 तासांपासून मतमोजणी सुरू आहे. सायंकाळी उशिरापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतदानात कोणत्याच उमेदवाराचा विजयी कोटा पूर्ण न झाल्याने मतमोजणीला विलंब, दुसऱ्या पसंतीच्या मतांची सध्या मोजणी सुरू आहे. आतापर्यंत 15 उमेदवार बाद करण्यात आले आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत प्रतापसिंह पाटलांना 74 हजार 19 मते पडली आहेत. तर सतीश चव्हाण यांना 60 हजार 854 मते मिळाली आहेत. विजयासाठी 88 हजार 558 मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील 13 हजार 165 मताने आघाडीवर आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us