दोन मित्र फिरण्यासाठी निघाले, कारचा स्पीड वाढवला अन् तेवढ्यात… तरुण डॉक्टरने गमावले प्राण

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बेराळा फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात मेहकरचे तरुण डॉक्टर ऋषिकेश काटे यांचा जागीच मृत्यू झाला. धोकादायक वळणावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

दोन मित्र फिरण्यासाठी निघाले, कारचा स्पीड वाढवला अन् तेवढ्यात... तरुण डॉक्टरने गमावले प्राण
dr death buldhana
Updated on: Dec 05, 2025 | 9:23 AM

बुलढाण्यातली चिखली ते छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गावरील बेराळा फाटा जवळ एक भीषण अपघात झाला आहे. बेराळा फाट्याजवळ असलेल्या एका अत्यंत धोकादायक वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात मेहकर येथील एका तरुण डॉक्टरचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ऋषिकेश काटे (३५) असे डॉक्टर तरुणाचे नाव आहे. यामुळे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. ऋषिकेश काटे हे दरेगाव येथील त्यांचे सहकारी वैभव जाधव यांच्यासह त्यांच्या कारमधून चिखलीहून मेरा मार्गे शेंदुर्जनजवळील दरेगावकडे नियोजित प्रवासाला निघाले होते. त्यांचा प्रवास सुखकर सुरू असताना, चिखली ते जालना महामार्गावरील बेराळा फाट्याजवळ असलेल्या एका धोकादायक वळणावर त्यांची कार पोहोचली. यावेळी त्यांच्या कारचा वेग प्रचंड होता. तसेच डॉ. ऋषिकेश काटे यांना रस्त्याचा अंदाज नव्हता. त्यामुळे त्यांचा वाहनावरील ताबा अचानक सुटला. गाडीवरील नियंत्रण सुटताच त्यांची कार रस्त्यावर उलटली आणि तिचा चक्काचूर झाला.

एकजण गंभीर जखमी

कार पलटी झाल्यानंतर डॉ. ऋषिकेश काटे यांच्या डोक्याला जबर मार लागला. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे सहकारी वैभव जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर बेराळा फाटा वळणाचा भाग वारंवार अपघातग्रस्त ठरत असून तो स्थानिक नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवला आहे. या अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील रस्ते सुरक्षा उपाययोजनांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा

डॉ. ऋषिकेश काटे हे मेहकर तालुक्यातील काटे पांगरी या ठिकाणचे रहिवाशी होते. डॉ. ऋषिकेश काटे हे मेहकर शहरातील जिजाऊ चौकाजवळ असलेले ऋषिकृपा सोनोग्राफी अँड डायग्नोस्टिक सेंटर चालवत होते. त्यांनी अल्पावधीतच वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण मेहकर परिसरातील वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.