जर्सी गायींच्या दुधामुळे नपुंसकता निर्माण झाली, मिलिंद एकबोटेंचा अजब दावा!

मिलिंद एकबोटे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात अजब विधान केले आहे. जर्सी गाय ही डुक्कर आणि काढवाच्या संयोगातून निर्माण झालेला प्राणी आहे. तसेच या गायीच्या दुधामुळे नपुसंकता निर्माण झाली, असा अजब दावा एकबोटे यांनी केलाय. विशेष म्हणजे आपल्या या भाषणात त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही खालच्या भाषेत टीका केलीय.

जर्सी गायींच्या दुधामुळे नपुंसकता निर्माण झाली, मिलिंद एकबोटेंचा अजब दावा!
milind ekbote
| Updated on: Aug 12, 2025 | 3:21 PM

हिंदुत्त्ववादी आणि महाराष्ट्र गोसेवा संघाचे कार्यकर्ते मिलिंद एकबोटे हे 2018 सालापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. 2018 साली हिंसाचार प्रकरणात त्यांच्याविरोधात पुण्यात अॅट्रॉसिटी आणि दंगल भडकवण्याच्या आरोपात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आता याच मिलिंद एकबोटे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात अजब विधान केले आहे. जर्सी गाय ही डुक्कर आणि काढवाच्या संयोगातून निर्माण झालेला प्राणी आहे. तसेच या गायीच्या दुधामुळे नपुसंकता निर्माण झाली, असा अजब दावा एकबोटे यांनी केलाय. विशेष म्हणजे आपल्या या भाषणात त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही खालच्या भाषेत टीका केलीय. त्यांच्या या वक्त्याची आता राज्यभरात चर्चा होत आहे.

जर्सी गायीच्या दुधामुळे येते नपुंसकता- एकबोटे

मिलिंद एकबोटे हे पुण्यातील एका कार्यक्रमात सभेला संबोधित करत होते. यावेळी बोलताना त्यांनी देशी गायींचे संगोपन आणि संवर्धन यावर भाष्य केले. याच विषयावर बोलत असताना जर्सी गायींचे दूध आरोग्यास योग्य नाही. याच गायींच्या दुधामुळे नपुंसकता आली आह, असा खळबळजनक दावा एकबोटेंनी केलाय.

मिलिंद एकबोटे नेमकं काय म्हणाले?

‘भारतातील गायीचे आज अर्जेंटिना, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांमध्ये संगोपन केले जाते. याद्वारे मोठा दुग्ध व्यवसाय निर्माण केला असून या तीन देशांमध्ये फक्त भारतीय गाईच्या दूध विक्रीचा कायदा केला आहे. तिथे जर्सी गायचे दूध विकण्यास परवानगी नाही. या उलट भारतात जर्सी गायीचे दूध विकले जाते. जर्सी गाय डुक्कर आणि गाढवाच्या संयोगातून निर्माण झालेला गायवर्गीय प्राणी आहे,’ असा अजब दावा एकबोटेंनी केलाय. तेसच जर्सी गायीच्या दुधामुळे डायबिटीससारखे आजार होतात. तसेच डायबिटीसपेक्षा या दुधामुळे नपुंसकता निर्माण झाली, असल्याचे मिलिंद एकबोटे म्हणाले. जर्सी गायीच्या दूधामुळेच पुणे शहरात टेस्टी ट्यूब बेबीचे कारखाने निघालेत, असंही अजब विधान त्यांनी केलंय. या कारखान्यांत वेटिंगलिस्टमध्ये लोकं उभी असतात, असं पुढे एकबोटे म्हणालेत.

मिलिंद एकबोटे अजित पवारांविषयी नेमकं काय म्हणाले?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “मला कुरेशी लोकांवर अन्याय झाल्याचे चालणार नाही” असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य केलय असं म्हणत गोसेवा संघाचे मिलिंद एकबोटे यांनी अजित पवारांवर टीका केली. अजित पवारांना असे वक्तव्य करताना जनाची नाही तर मनाची बाळगायला हवी होती, असा घणाघात एकबोटे यांनी केला आहे. अजित पवारांना मोदींचा आशीर्वाद मिळाला आणि त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले आहे, याची जाणीव पवारांनी ठेवावी. भगव्याचा मान राखून हिंदुत्वाची जाण राखली पाहिजे, असा सल्लाही एकबोटे यांनी दिलाय.

अजितदादांचे कार्यकर्ते काय उत्तर देणार?

दरम्यान, आता मिलिंद एकबोटे यांनी जर्सी गाय आणि नपुंसकत्व यावर केलेल्या विधानामुळे राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. तसेच एकबोटे यांनी अजित पवार यांना उद्देशून लाज बाळगायला हवी होती, असे विधान केल्यामुळे आता अजित पवार यांचे कार्यकर्ते नेमकं काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.