
सोलापूर जिल्ह्यातील पेनूर गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले यांनी मोहोळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील यांच्यावर सडकून टीका केली. कोण पाटील असेल नाहीतर कोणीही असेल. आमच्याकडे असे कोणी करणारा असता तर त्याची आय झ्याक केली असती, असे भरत गोगावले म्हणाले.
आम्ही तर त्याची आय झ्याक केली असती. इथं मी शब्द वापरत नाही, कारण इथे महिला भगिनी आहोत. पण आमच्याकडे असे कोणी करणारा असता, तर त्याची आय झ्याक केली असती. कोण पाटील असेल नाहीतर कोणीही असेल. शिवाजी महाराजांनी पाटलांचे चौरंग केले होते. आज चांगला दिवस आहे त्यामुळे त्याचे नाव घेत नाही. लोकांच्या लेकीबळीचा विचार करा. कोण कुठला पाटील? आम्ही त्याचा हिशोब चुकता करु, असे भरत गोगावले म्हणाले.
“चूक झाल्यास दुरुस्ती केली तर ठीक पण चुकून दादागिरी करत असेल तर त्याला सोडणार नाही. आम्ही आगामी काळात त्याचा हिशोब चुकता करु. जन्माला येऊन एकदा तरी पंढरी आणि आळंदीची वारी करावी. पण आता लोकं शिर्डीची वारी करत आहेत. अनेक तरुण पायी शिर्डीला चालत जातात. श्रीमंत लोक तिरुपती बालाजीला जातात. तिथे कडक लाडू मिळतो. तिथे लोकांना लवकर आशीर्वाद मिळत असेल. माझं म्हणणं आहे की सगळीकडे जा, पण जन्माला येऊन एकदा तरी रायगडावर या”, असे भरत गोगावलेंनी म्हटले.
“तुम्ही सगळीकडे जावा, पण एकदा तरी रायगडाला या. एकदा राज्याभिषेक सोहळ्याला नक्की या. राजू तू पांडुरंगाला श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली असेल. पण निवडणूक जाहीर झाल्यावर रायगडावर जाऊन जगदीश्वराला श्रीफळ वाढवतो आणि शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो, मी आजपर्यंत पराभूत झालो नाही”, असे भरत गोगावले म्हणाले.
“राजू तू भाग्यवंत आहेस. कारण हा कार्यक्रम निवडणुकीआधी होणार होता. मात्र तू आमदार व्हायचा होतास, म्हणून हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला मंत्री असेल की उद्या माझे नाव जाहीर होणार होते. मात्र आमचे नेते थोडे चिंतेत दिसले. म्हणून मी लगेच सांगितले साहेब फक्त मंत्री असल्यावरच काम करता येते असे नाही. मंत्री नसतानाही आम्ही काम करू शकतो. पंधरा वीस दिवसांनी मंत्रिपद मिळेल असे वाटले, पण मिळाले नाही. मात्र तरीही आम्ही नाउमेद न होता काम करत राहिलो”, असे भरत गोगावलेंनी म्हटले.