
राज्यातील मराठा आंदोलनाचा प्रश्न चिघळताना दिसतोय. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. मात्र, मुंबई पालिकेच्या समोरील मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्येही मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमजले आहेत. शिवाय मुंबईतील मुख्य रस्त्यांवर त्यांनी वाहने लावल्याने वाहतूकीचे तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यावर कबड्डी, खो खो आंदोलकांकडून खेळली जात आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा निर्णय घेत वाहतूकीत मोठे बदल केले आहेत. आता नुकताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे विधान मराठा आरक्षणाबद्दल केले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, न्यायालयीन प्रक्रियेमुळे वेळ लागत आहे. सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकला पाहिजे, यासाठी आमच्याकडून प्रयत्न केली जात आहेत. मराठा समाजाने यापूर्वी बरीच मोर्चे काढली आहेत. त्याची चर्चा ही देशभर झाली आणि कुठेही गालबोट लागले नाही. कारण असे झाले तर समाजाची बदनामी होते. आता जी काही मंडळी काही प्रकार करतात रस्ते अडवणे किंवा रिर्झेव बॅेंकेसमोर जाऊन घोषणाबाजी केल्याने आरक्षण मिळणार नाहीये, असे केल्याने प्रश्न सुटणार नाही.
आज जरांगे पाटील हे स्वत: आझाद मैदानावर बसलेले आहेत. तर सर्व मराठा बांधवांनी देखील आझाद मैदानावरच गेले पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आपण मुंबईला आलो कशा करता? त्यामुळे मुंबईकरांचे हाल नको आहेत. आपलीही बदनामी नको. आंदोलनकर्त्यांमुळे मुंबईमध्ये थोडा परिणाम होईल, पण मला वाटत नाही की, यावर टीका करण्याचे काही कारण आहे.
शेवटी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठा बांधव हा आझाद मैदानात येत असेल तर त्यात गैर काही नाही पण त्याशिवाय अन्य ठिकाणी जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यात समाजाचीही बदनामी होते, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री, उपसमिती अध्यक्ष आणि महाधिवक्ता यांच्यात बैठक पार पडणार आहे. जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कायदेशीर मुद्दे उपस्थित होत असल्याने सरकारची खलबतं.