Vijay Wadettiwar : पैलवान मंत्र्याने महिलेला विवस्त्र फोटो पाठवला, त्यानंतर…विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप
Vijay Wadettiwar : "धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. त्याला सहआरोपी करण्याइतपत पुरावे नक्की मिळतील आणि आहेत. आता यानंतर अनेक खुनांचा उलगडा होईल. महाराष्ट्र बिहारच्या पुढे आहे का?" असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला. महाराष्ट्र विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाला तिसरा दिवस असून सभागृहात जाताना विजय वडेट्टीवार मीडियाशी बोलले आहेत.

“मी काँग्रेसच्या विचारधारेशी जोडलेलो आहे. मी कोणाशी बोललो नाही. चर्चा नाही, प्रस्ताव नाही. मी पुन्ह म्हणेन मी काँग्रेसचा शिपाई आहे. सत्ता येवो न येवो मी माझ्या पक्षात आहे. या सर्व खोट्या बातम्या आहेत. मी स्वप्नात सुद्धा विचार करु शकत नाही” असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. आपण काँग्रेस पक्षासोबतच निष्ठावंत म्हणून राहणार असल्याच त्यांनी स्पष्ट केलं. “मी पुरोगामी विचारांशी जोडलेला कार्यकर्ता आहे. जातीयवादी शक्तींसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. हे होऊ शकत नाही. या अफवा आहेत. माझी कोणाशी चर्चा झालेली नाही. याआधी भाजपशी नाव जोडलं गेलं. कुठून येतं हे कळत नाही. पण कोण तो लोफर, बदमाश माणूस आहे, जो या बातम्या पसरवतो” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
“आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आहे. आमचे पाच मंत्री काय करतायत, काय चाललय या सरकारमध्ये? उभा धिंगाणा सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातला रोज व्यायाम करणारा एक पैलवान मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो. दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो. त्याच्यापुढे जाऊन 10 हजार रुपये दंड भरुन माफी मागतो. मंत्री झाल्यावर पुन्हा त्या महिलेच्या मागे लागतो, ब्लॅकमेल करतो” असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. “एकतर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री, माजी राष्ट्रपतींची जमीन ढापतो. म्हणजे कल्पनाच करु शकत नाही. केवढी हिम्मत या मंत्र्यांची. पहिल्या महिला राष्ट्रपती, त्यांची 26 एकर जमीन. वरती मंत्रिमंडळात हा मंत्री मान वर करुन फिरतो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे. मंत्रिमंडळात यांना मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का?” असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारलाय.
अबू आझमी-भाजपमध्ये मॅच फिक्सिंग
“धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. कोकाटेंचा बाकी आहे. आज हा विषय घेऊ. काल जी घटना घडली, त्यावर अबू आझमी आणि भाजपने मुख्य मुद्यावरुन पळवाट काढण्यासाठी मॅच फिक्सिंग केली होती” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. “अबू आझमींच्या मागे सध्या जे काही सुरु आहे, त्यातून बचावासाठी आझमींनी भाजपने दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली. भाजप, सत्ताधाऱ्यांना थोडी जरी लाज असेल तर कोरटकर, सोलापूरकर, कोश्यारी, छिंदम हे सगळे बोलतात त्यावर तोंड बंद का?. महापुरुषांचा अवमान करणारी टिप्पणी करतात त्यावर बोलू शकत नाहीत” असं विजय वडेट्टीवाकर म्हणाले.
