मोठी बातमी! आमदाराच्या भावाचा कलाकेंद्रात गोळीबार? डान्स करणारी तरुणी जखमी?

पुण्यातील दौंडजवळच्या अंबिका कला केंद्रात एका राजकीय नेत्याच्या भावाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मोठी बातमी! आमदाराच्या भावाचा कलाकेंद्रात गोळीबार? डान्स करणारी तरुणी जखमी?
ambika kala kendra firing
| Updated on: Jul 23, 2025 | 6:49 PM

Pune Kalakendra Firing : पुण्यातील दौंडजवळच्या अंबिका कला केंद्रात एका राजकीय नेत्याच्या भावाने गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. कलाकेंद्रात डान्स सुरू असताना हा गोळीबार झाला आहे. गोळीबार करणारा हा एका आमदाराचा भाऊ असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी बाळासाहेब मांडेकर यांच्यासह एकूण तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अंबिका कला केंद्रात गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार अंबिका कलाकेंद्रात डान्स सुरु होता. हा डान्स सुरू असतानाच एका आमदाराच्या भावाने हवेत गोळीबार केल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे या गोळीबारत नृत्य करणारी तरुणीही जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. अंबिका कला केंद्रात ही घटना घडली आहे. या प्रकरणात पुण्यातील यवत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी तपास करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक थेट कला केंद्रावर गेले असून चौकशी केली जात आहे.

रोहित पवारांचा धक्कादायक आरोप

हे प्रकरण घडताच विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पोलीस कुठली माहिती दाबवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते योग्य ठरणार नाही. आमच्या माहितीनुसार ज्या कलाकेंद्रात ही घटना घडली, त्या कलाकेंद्राच्या लोकांवरही दबाव टाकला जात आहे. जखमी झालेली तरुणी तसेच इतर महिलांनी कुठेही बोलू नये असा दबाव टाकला जात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय.

सत्तेमध्ये असलेल्या लोकांना धाक राहिलेला नाही

तसेच आम्ही आमच्या पद्धतीने या प्रकरणाची माहिती घेत आहोत. ही माहिती आमच्या हाती लागताच ती पोलिसांना देऊ, असेही रोहित पवार यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. सत्तेमध्ये असलेल्या लोकांना धाक राहिलेला नाही. आम्ही काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.सत्तेचा वापरच चुकीच्या पद्धतीने होत आहे, असा गंभीर आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

दरम्यान, या प्रकरणी पुणे ग्रामीणच्या एसींनी प्रतिक्रिया दिली आहे. कलाकेंद्राच्या रूममध्ये फायरींग झाल्याची माहिती मिळाली होती.21 किंवा 22 जुलै रोजी ही बातमी बाहेर आली होती. आम्हाला ठोस माहिती मिळाली नव्हती. 21 तारखेला रात्री 10.30 वाजता हवेत फायर झाल्याची घटना घडली. याबाबत आता अंबिका कलाकेंद्राच्या मालकाने तक्रार दिली आहे. या घटनेत कुणीही जखमी नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.