राज ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, ऐन गणेशोत्सवात मनसेचा मोठा दणका

डोंबिवलीतील एका कॅफेमध्ये काम करणाऱ्या आशुतोष गिरी याने सोशल मीडियावर आणि कॅफेमध्ये राज ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्ये केल्यामुळे त्याला मनसेच्या हस्तक्षेपाने नोकरी गमवावी लागली. मनसे पदाधिकाऱ्यांनी कॅफे व्यवस्थापनाला याबाबत तक्रार केली

राज ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, ऐन गणेशोत्सवात मनसेचा मोठा दणका
raj thackeray
| Updated on: Sep 01, 2025 | 11:49 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल सातत्याने सोशल मीडियावर आणि सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्य करणे एकाला भोवलं आहे. डोंबिवलीतील कॅफेमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला मनसेच्या दणक्यानंतर नोकरी गमवावी लागली आहे. आशुतोष गिरी असे कामावरून काढलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे राज ठाकरेंबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांना मनसे सोडणार नाही, असा संदेश पुन्हा एकदा समोर आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील (घरडा सर्कल) एका कॅफेमध्ये आशुतोष गिरी नावाचा कामगार काम करत होता. तो केवळ सोशल मीडियावरच नव्हे, तर कॅफेमध्येही मनसे पक्ष आणि अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल वारंवार बेताल वक्तव्ये करत असल्याची माहिती समोर आली. तसेच, तो त्या दुकानातील इतर मराठी कामगारांनाही त्रास देत होता, त्यांच्याशी वाद घालत होता. या सततच्या त्रासामुळे आणि अपमानामुळे कॅफेमधील मराठी कामगार वैतागले होते.

मनसे पद्धतीने धडा

या गंभीर बाबीची माहिती स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. गणेशोत्सवाचे दिवस असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट कॅफेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला. त्यांनी व्यवस्थापकाला या प्रकाराबद्दल जाब विचारला. तसेच हा कामगार पुन्हा दुकानात दिसू नये, अन्यथा त्याला मनसे पद्धतीने धडा शिकवू, असा स्पष्ट इशारा दिला.

मनसेच्या या कठोर भूमिकेनंतर कॅफे व्यवस्थापनाने तात्काळ कारवाई करत आशुतोष गिरीला कामावरून काढून टाकले. तसेच मनसे पदाधिकाऱ्यांची माफी मागितली. या घटनेमुळे राज ठाकरेंबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांना मनसे सोडणार नाही, असा संदेश देण्यात आला आहे. ही घटना केवळ एका कामगाराच्या नोकरीपुरती मर्यादित नसून, सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा नेत्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करताना विचारपूर्वक बोलण्याची गरज आहे. अन्यथा, त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात, असा सल्लाही मनसेने दिला.