Raj Thackeray : धर्मेंद्र प्रधानांच्या मुलीच्या शिक्षणावरुन राज ठाकरेंचा विचार करायला भाग पाडणारा प्रश्न
Raj Thackeray : "शिव्या देऊ नये म्हणत असाल, तर शिव्या देण्याचा अधिकार काय भाजपला आहे का? भाजपला आयाबहिणी काढण्याचा अधिकार आहे का? नीट ही सुरुवात आहे. अजून बघा काय काय होतंय ते" असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

नीट पेपर फुटी प्रकरणाच्या मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “आपल्या देशातील विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहे. त्यांच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. दरवर्षी आंदोलन होत आहेत. या शिक्षण पद्धतीला गांभीर्याने घेत नसाल आणि विद्यार्थ्यांनी चिडू नये असं म्हणत असाल. शिव्या देऊ नये म्हणत असाल, तर शिव्या देण्याचा अधिकार काय भाजपला आहे का? भाजपला आयाबहिणी काढण्याचा अधिकार आहे का? नीट ही सुरुवात आहे. अजून बघा काय काय होतंय ते” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
“प्रत्येकाच्या महत्त्वांकाक्षा मोठ्या झाल्या आहेत. प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचं आहे. शत्रू संपवण्याची प्रक्रिया भाजपमध्ये सुरू झाली आहे. पहिल्यांदा कॉलेजची भूमिका काय, धंदेवाईक क्लासेस सुरू झाले आहेत ते हटणार की नाही. सरकारचा कस तिथे लागला पाहिजे. यांच्या धंदेवाईकपणामुळेच या गोष्टी सुरू आहेत. वर्तमानपत्राला पानभर जाहीरात दिली जाते. हा पहिला आला तो आला. कसा आला. हेच पेपर फोडणार” अशी टीका राज ठाकरेंनी केली. “सर्व गोष्टी सर्वांना माहीत आहेत. कोणी कंट्रोल करत नाही. म्हणजे काय. सरकारचे लोक त्यात अडकले आहेत का? त्यात कोणी आहे का? या सर्व गोष्टींची उत्तरे सरकारने द्यावी” असं राज ठाकरे म्हणाले.
प्रधानांच्या मुलीचा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नसेल तर?
“सर्व आम्हालाच कळतं यातून सरकार बाहेर येईल आणि तज्ज्ञांशी बोलेल तेव्हाच सोल्यूशन निघेल. आता निलेकनींना आणलं. माहीत नाही काय करतील” अशी टीका राज ठाकरेंनी केली. मोहन भागवत यांनी जेन झीं शी संवाद साधला. त्यावर ‘उशिर झाला. संवाद साधायला उशीर झाला’ असं राज ठाकरे म्हणाले.
“मुलं काय म्हणत आहेत हे समजून घेणार आहोत का? त्यांना, त्यांच्या आईवडिलांना काय त्रास होतोय हे समजून घेणार आहोत का? मोबाईलवर ही मुलं बघतात, जग जेव्हा पाहतात तेव्हा कोण राहील इथे. परवाच मी बाहेर गेलेल्या मुलांचा आकडा वाचून दिला. पाच लाख कोटी पालक मुलांना देशाच्या बाहेर शिक्षणासाठी पाठवतात. सरकारमधील मंत्र्यांची मुलं बाहेर शिकतात. धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी बाहेर परदेशात शिकते. प्रधानांच्या मुलीचा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नसेल तर बाकीच्या मुलांचं काय घेऊन बसलात” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.