Raj Thackeray : हा प्रश्न तुमच्या दृष्टीकोनाचा आहे, राज ठाकरे ज्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेले त्यांनाही दिला शिस्तीचा धडा
Raj Thackeray : राज ठाकरे हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. सामाजिक मुद्यांवर ते ठामपणे बोलतात. काही गोष्टी अधिकारवाणीने सांगतात. राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या याच स्वभावाचं दर्शन घडवलं.

“शहर म्हणून आपण कुठली शिस्त पाळत नाही. सगळ्या गोष्टी पोलिसांवर टाकतो. मला वाटतं आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. एखाद्या गाडीने कुठे फिरायला जाताना, गाडी कुठे पार्क करायची, कसलाही विचार नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टिम आणली की ती खराब करायची. आज रेल्वेने लाखो प्रवासी प्रवास करतात. उद्या रेल्वे कोलमडली तर, सगळे गाड्या घेऊन आले तर कुठून बाहेर पडणार आहोत. काही आगापिच्छा राहिलेला नाही” अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते नवी मुंबईत मनसेच्या वाहतूक मेळाव्यात बोलत होते. “शहरांना आकार राहिलेला नाही. फुटपाथवरुन चालता येत नाही. चांगली मैदानं, बागा नाहीत. 7.8 टक्के जीडीपी सांगायचा. काय चाटायचं आहे ते” अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
“कोणत्या गोष्टीत शिस्त उरलेली नाही. कुठेही टॉवर उभे राहतात, तलाव बुजवून टाकले आहेत.शिस्त म्हणतात का याला?. मी माझ्या अनेक मुलाखतींमधून सांगितलं आहे. 96-97 साली स्विर्त्झलंड फिरायला गेलेलो. तो देश फिरत होतो. सुंदर रस्ते, सुंदर इमारती, सुंदर निसर्ग आहेत. प्रत्येकाला काम आहे. वाहतुकीला शिस्त आहे. मला तिथे फिरताना प्रश्न पडला, इथला विरोधी पक्ष भांडतो कुठल्या मुद्यावर. निवडणुकीच्यावेळी काय सांगतात हे. त्यांचेही मुद्दा आहेत, पण ते वेगळे आहेत” असं राज ठाकरे म्हणाले.
तो विचार करतो त्याच्या दृष्टीकोनातून
“महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येणारा माणूस मंत्रीपदावर बसतो. त्याला मुंबई, नवी मुंबई, पुण्याचे प्रश्न नाही समजू शकत. आज आपण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेलो तर तिथले प्रश्न आपल्याला नाही समजू शकतं. एखादा मंत्री येतो, बसतो बोलतो काय समस्या आहे तुमची. तो बघतो शहरात रस्ते, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, वीज आहे. नळाला पाणी आहे. तो विचार करतो त्याच्या दृष्टीकोनातून. आमच्याकडे रस्ते, पाणी नाही. लोडशेडिंग आहे. त्याच्या तुलनेत शहराकडे बघतो. त्याला वाटतं सगळच आहे इथे. हा प्रश्न तुमच्या दृष्टीकोनाचा आहे” असं राज ठाकरे म्हणाले.
कोण ट्रॅफिक सिग्नल पाळतोय का?
“त्यासाठी तज्ज्ञ मंडळी असतात. त्यांना विश्वासात घेऊन आराखडा करायचा असतो. फक्त बिल्डरच्या दृष्टीकोनातून डेवलपमेंट प्लान आखला जातो. कुठली जमीन विकायची आहे. सतत गाड्या येत जात असतात. कोण ट्रॅफिक सिग्नल पाळतोय का?. मी खरचं वाट बघतोय महाराष्ट्र माझ्या हातात कधी सत्ता देतोय. अशा प्रकारची शिस्त आणेन हे काही रॉकेट सायन्स नाही. याला इच्छा लागते. आज वाहतूकदारांचे प्रश्न आहेत. तुम्ही सगळे इथे आलात. तुम्ही सुद्धा ट्रक, टेम्पोला शिस्त आणणं गरजेच आहे” असं राज ठाकरे म्हणाले.