गणपतीला कशी सलामी देतो, बघतोच; ठाकरेंच्या इम्रान शेख विरोधात मनसे आक्रमक
विक्रोळीत गणेश विसर्जनानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अग्निशमन दलाने गणरायाला सलामी न दिल्याने मनसे नेते गणेश चुक्कल यांनी थेट ठाकरे गटाच्या इम्रान शेख यांच्यावर आरोप केला आहे.

मुंबईच्या विविध ठिकाणी गणेश विसर्जन झालं. मुंबईतील शेकडो गणेश मंडळांच्या मूर्तीचं थाटामाटात विसर्जन झालं. परंतु विक्रोळीत गणेश विसर्जनानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विक्रोळी येथील पार्क साईटचा राजाच्या विसर्जनानंतर काहीसं नाराजीचे वातावरण पसरलं आहे. मागील 65 वर्ष विसर्जनाच्या मिरवणुकीला अग्निशमन दलाकडून सायरन वाजवून सलामी दिली जात होती, पण यंदा ती देण्यात आली नाही. याबाबत मनसेचे विभागप्रमुख गणेश चुक्कल यांन अग्निशामक दलाचे प्रमुख अंबुलगेकर यांना पत्र देत नाराजी व्यक्त केली आहे.
मनसे नेते गणेश चुक्कल यांनी या घटनेला ठाकरे गटाचे पदाधिकारी इम्रान शेख यांना कारणीभूत ठरवलं आहे. त्यांनी अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप केला आहे. इम्रान शेख यांची तक्रार आता उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांना निवेदन देऊन समज देण्यात यावी, अशी भूमिका गणेश चुक्कल यांनी मांडली आहे. गणेश चुक्कल म्हणाले, मागील ६५ वर्ष पार्कसाइट येथे गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. विक्रोळीतील गणरायाला अग्निशामक दलाकडून सलामी देण्यात येते, पण यंदा देण्यात आली नाही’.
‘इम्रान शेख यांनी ईद ए मिलादला वाद घातला आणि गणपतीला कसे सलामी देता, हे बघतो असे धमकावले होते. अशा धर्मांध प्रवृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे. हे चुकीचे आहे, अशांना समज दिली पाहिजे. गणेशोत्सव आराध्य दैवत आहे. या वादावर अंबुलगेकर यांनी म्हटले आहे की, आम्ही ही परंपरा सुरूच ठेवू आणि चूक झाली असे ते म्हटले आहे. आम्ही ही सगळी माहिती ठाकरेंच्या नेतृत्वाकडे देणार आहोत. त्यांच्या पक्षाने त्यांना समज दिली पाहिजे. आम्ही त्यांना पक्षाकडून समज देण्यात यावी, असे निवेदन उद्धव ठाकरे यांना देऊ, असे गणेश चुक्कल यांनी सांगितले. तत्पूर्वी, ठाकरे बंधू मोर्चासाठी एकत्र आले आहेत. दोन्ही बंधू 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहेत. यासाठी दोघेही मोर्चाची तयारी करत असताना विक्रोळीत दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामुळे विक्रोळी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.