
आज मनसेचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त चिंचवड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केले आहे. या भाषणात त्यांनी ‘२० दिवसावर गुढी पाडव्याचा मेळावा आहे. तिकडे मी दांडपट्टा फिरवणार असेल तर आता चाकू सुरे कशाला काढू’ असे सांगितले. त्यानंतर त्यांनी अगदी थोडक्यात वांद्रे-वरळी सीलिंक मुद्द्यावर वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाच्या सुरुवातील सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणाचा उल्लेख करत, ‘आज मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. मोरे सरांनी आताच्या परिस्थितीवर बोलावं म्हणून त्यांना बोलावलं. त्यांची व्याख्याने ठेवणार आहे. आज राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. मते मिळवण्यासाठी तुमची डोके फोडून घेतात, आग लावतात हे आपल्या लोकांना समजत नाही. मोरे सरांनी अनेक विषय सांगितले. रामायण काळापासूनच्या गोष्टी सांगितल्या’ असे म्हटले.
वांद्रे- सी लिंक तयार व्हायला जवळपास १४ वर्षे लागली. या विषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘प्रभू रामचंद्रांना जेव्हा वनवास झाला तेव्हा तो १४ वर्षाचा झाला. अयोध्येतून ते निघाले. सोबत लक्ष्मण सीतामाईंना घेऊन निघाले. तेथे रावण आला आणि सीतामाईला घेऊन गेला. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीतामाईंना शोधत होते. वाली सुग्रीव मिळाले. हनुमान भेटला. लंकेत गेले. कुंभकर्णाला मारलं. रावणाला मारलं. सीतामाईला घेऊन आयोध्येला आले. मध्ये त्यांनी एक सेतू बांधला. हे त्यांनी १४ वर्षात केलं. आणि वांद्रे वरळी सी लिंक आपण १४ वर्षात बांधला. कुठे आयोध्या, दंडकारण्य, कुठे लंक सेतूबितू बांधून गेले. हे सर्व १४ वर्षात घडलं.’
पुढे त्यांनी या भाषणात सोशल मीडियाचा वापर हा लोकांना भडकवण्यासाठी केला जात आहे असे म्हटले आहे. ‘हे सर्व कामे आहेत ना त्यावर मी सविस्तर गुढी पाडव्याच्या दिवशी बोलणार आहे. या सर्व गोष्टीकडून तुम्हाला गुमराह करण्यासाठी जातीपातीचे विषय काढले जात आहे. सोशल मीडियातून तुमची टाळकी भडकवत आहेत. जाणूनबुजून हे उद्योग सुरू आहे’ असे राज ठाकरे म्हणाले.