मान्सून आठ दिवस आधीच केरळमध्ये, महाराष्ट्रात कधी येणार? मुंबई, पुण्यात रात्रभर रिमझिम पाऊस

मान्सून केरळमध्ये वेळेआधीच पोहचला आहे. त्याची वाटचाल आता महाराष्ट्राच्या दिशेने सुरु झाली आहे. सिंधुदुर्गात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. सिंधुदुर्गात चार दिवस सूर्यदर्शन देखील झाले नाही.

मान्सून आठ दिवस आधीच केरळमध्ये, महाराष्ट्रात कधी येणार? मुंबई, पुण्यात रात्रभर रिमझिम पाऊस
Mansoon Forcast Updates 2025
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 25, 2025 | 8:24 AM

Monsoon Update: देशातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. २००९ नंतर प्रथमच मान्सून केरळमध्ये इतका लवकर दाखल झाला आहे. दरवर्षी १ जून रोजी येणार मान्सून या वर्षी २३ मे रोजीच केरळमध्ये पोहचला आहे. केरळबरोबर तामिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेरले आहे. या तिन्ही राज्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. दरम्यान, मान्सूनची वाटचाल गोव्याकडे सुरु झाली आहे. तसेच पुढच्या दोन-चार दिवसांतच मान्सून कोकण-गोव्यात येण्याची शक्यता आहे. मुंबई येथील विभागीय हवामानशास्त्र केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी मान्सूनची वाटचाल राज्याच्या दिशेने सुरु असल्याचे सांगितले.

दक्षिण कोंकण किनाऱ्यावर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. २४ मे रोजी हा पट्टा रत्नागिरीपासून ४० किलोमीटर अंतरावर उत्तर-पश्चिम भागात होता. आता त्याची वाटचाल पूर्वकडे सुरु झाली आहे. २५ रोजी सकाळी कमी दबाचा पट्टा रत्नागिरी आणि दापोली किनारा पार करणार आहे.

 

मुंबई-पुण्यात पाऊस

मुंबई आणि पुण्यात रात्रभरापासून रिमझिम पाऊस सुरु आहे. पुण्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अधूनमधून पाऊस सुरु आहे. हा पाऊस पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. मुंबई आणि परिसरात रविवारी सकाळी पासूनच पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई परिसरात सकाळपासून पावसाने हजेरी जरी लावली असली तरी याचा लोकल किंवा मुंबई शहरातील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. रविवार सुट्टीचा दिवस असतानाही रेल्वे प्रशासनाने दिवसाचा कोणताही मेगाब्लॉक घेतला नाही. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास साडे तीन तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्यरात्रीच्या जम्बो ब्लॉकमध्ये पटरी, इलेक्ट्रिक काम करण्यात येणार आहेत. मुंबई परिसरात आज सकाळपासून पडणाऱ्या पावसाने दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर पाणी साचले. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी शिवाजीपार्क मैदान खेळाडूने गजबजलेले असते. पण पावसामुळे आज पूर्ण मैदानात शुकशुकाट आहे.

सिंधुदुर्गात रेड अलर्ट

सिंधुदुर्गात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. सिंधुदुर्गात चार दिवस सूर्यदर्शन देखील झाले नाही. चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने जिल्ह्यात थैमान घातले होते. सातारा जिल्ह्यात पाच दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात ओझर्डे धबधबा वाहू लागला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात मे महिन्यात पहिल्यांदाच हा धबधबा प्रवाहित झाला आहे.