
धुळे जिल्ह्यातील शिरपूरातून एक आनंददायी आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे…रामनवमीच्या शुभदिनी एका मातेनं एकाच वेळी तीन गोंडस बाळांना जन्म दिला आहे…विशेष म्हणजे लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनी या दाम्पत्याच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला असून, सध्या आई आणि तिन्ही बाळांची प्रकृती स्थिर आहे. शिरपूर शहरातील आदिशक्ती या खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया न करता नैसर्गिक अनोखी प्रसूती पार पडली, मध्यप्रदेशातील आमल्यपाणी येथील रहिवासी असलेल्या 30 वर्षीय संगिता विश्राम पावरा यांना रामनवमीच्या दिवशी पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं.
त्याच दिवशी त्यांची यशस्वी प्रसूती झाली. यावेळी त्यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन बाळांना जन्म दिला. या तिन्ही बाळांच्या जन्मामध्ये अवघ्या एका मिनिटाचे अंतर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विशेष म्हणजे तिन्ही बाळं मुलं असून आईसह सर्वांची प्रकृती सध्या ठणठणीत आहे. ही प्रसूती संगिता पावरा यांची पहिलीच असून, लग्नानंतर आठ वर्षांनी त्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे… एकाच वेळी तीन बाळांच्या आगमनाने पावरा कुटुंबात आनंदाचा उत्सव साजरा केला जात आहे.
आदिशक्ती रुग्णालाच्या डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार, ‘तीन बाळ असलेली डिलिव्हरी होणं फार अवघड असतं. अशी डिलिव्हरी काळजी आणि देखरेखीखाली करण्यात येते… कदाचित शिरपूर येथे ही पहिलीच डिलिव्हरी असेल. जी सी – सेक्शनने न होता नॉर्मल झाली आहे. आमच्यासाठी देखील हा एक इतिहास आहे.’
डॉक्टर पुढे म्हणाले, ‘एकाच वेळी तीन बाळांची डिलिव्हरी मोठी रिस्क असते. अशात महिलेची पहिलीच डिलिव्हरी होती. पहिल्यांचा महिला रुग्णालयात आली तेव्हा तिच्या शरीरात फक्त 4 – 5 ग्रॅम रक्त होतं. तिचे हात – पाय देखील खूप जास्त सुजलेले होते. त्यानंतर दिलेल्या वेळेत त्या रुग्णालयात आल्या. त्यामुळे पेशेंट आणि नातेवाईकांचं देखील कौतुक करायला पाहिजे. पेशेंट सुशिक्षित नसले तरी, त्यांना योग्या मार्गदर्शन केल्यानंतर ते देखील स्वतःची काळजी घेतात आणि उपचार घेतात.’
महिलेचं आणि कुटुंबियांचं देखील डॉक्टरांनी कौतुक केलं. ‘महिला नचूकता रुग्णालयात येत होती. बीपी खूप जास्त वाढल्यामुळे त्यांना गोळ्या सुरु केलेल्या. त्यानंतर आठ दिवसांत महिलेची प्रकृती स्थिर झाली. म्हणून त्यांचा विश्वास आमच्यावर बसला. आम्ही आईसह तीन बाळांना वाचवण्याची शाश्वती त्यांना दिलेली. याच विश्वासावर त्या रुग्णालयात येत होत्या आणि आज (शुक्रवार) सकाळी 7 वाजता महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाली. आता महिलेसह तीनही बाळांची प्रकृती स्थिर आहे… असं देखील डॉक्टर म्हणाले.