व्हाइट हाऊसजवळ गोळीबार, जिममध्ये घुसून थेट… 1 जण दगावला, 4 जखमी; नेमकं काय घडलं?
White House shooting : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाइट हाऊसजवळ गोळीबाराची घटना घडली आहे. लॉगन सर्कल परिसरातील एका फिटनेस सेंटरमध्ये घुसून बंदुकधाऱ्याने गोळीबार केला.

अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाइट हाऊसजवळील लॉगन सर्कल परिसरात गोळीबाराची घटना घडली. गोळीबाराची सुरुवात एका फिटनेस सेंटरमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हल्लेखोराने बाहेरही गोळीबार केला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य 4 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून इतर तिघांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर जवळच्या इमारतीत लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
नेमकं काय घडलं?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एक बंदुकधारी व्यक्ती आधी जिममध्ये शिरला. त्याने नंतर एकावर गोळ्या झाडल्या आणि नंतर बाहेर पडला. संशयिताने बाहेर पडून रस्त्यावरही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी गोळीबाराचा आवाज ऐकू आला. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून जवळच्या शाळांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले. एनबीसी न्यूजने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
घटनेच्या वेळी जिममध्ये ट्रेडमिलवर व्यायाम करणाऱ्या एका महिलेने हा थरार सांगितला. तिने गोळी लागलेली व्यक्ती इमारतीबाहेर पळताना पाहिली. परिस्थिती इतकी भीषण होती की, बाहेर पडण्यासाठी त्या जखमी व्यक्तीला गोळीबार झालेल्या ठिकाणावरूनच जावे लागले, असे तिने सांगितले.
पोलिसांकडून परिसराची नाकेबंदी
पोलिसांनी 15 वी आणि पी स्ट्रीट्स एनडब्ल्यू परिसरात अनेकांना गोळ्या लागून जखमी झाल्याच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाहीये. दरम्यान, संशयिताला सुरक्षा यंत्रणांनी घेरल्याची माहिती आहे. पोलिसांनी नागरिकांना 1500 ब्लॉक परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. जवळील शाळा, रस्ते आणि इमारतींना सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ अल्कोहोल, टोबॅको, फायरआर्म्स अँड एक्सप्लोसिव्हजनेही घटनास्थळी मदतीसाठी आपले एजंट पाठवले आहेत.
काही दिवसांआधीच घडलेली घटना
अमेरिकेतील मेने राज्यातील लेव्हिस्टन शहरात 26 ऑक्टोबर 2023 रोजी अंधाधुंद गोळीबाराची घटना घडली होती. या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला होता, तर डझनभर नागरिक जखमी झाले होते. तीन ठिकाणी गोळीबार करणारे हल्लेखोर फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले होते.
