दोन चिमुरड्यांना खाडीत सोडून आई गेली कुठे? डोंबिवलीतील मन हेलावून टाकणारी घटना

| Updated on: Dec 08, 2020 | 7:01 PM

डोंबिवलीत एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे (Mother missing after releasing two young children into the bay).  

दोन चिमुरड्यांना खाडीत सोडून आई गेली कुठे? डोंबिवलीतील मन हेलावून टाकणारी घटना
Follow us on

ठाणे : डोंबिवलीत एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीच्या खाडीत पाण्याच्या मधोमध असलेल्या एका मोठ्या दगडावर सोमवारी (7 डिसेंबर) संध्याकाळी दोन लहान मुलं रडत होती. या मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकूण काही ग्रामस्थांची नजर त्यांच्याकडे गेली. मुलांना पाण्यात बघून ग्रामस्थ हैराण झाले. अखेर कचोरे गावातील ग्रामस्थांपैकी गणेश मुकादम आणि तेजस मुकादम हे खाडीच्या पाण्यात उतरले. त्यांनी दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. यापैकी एक मुलगा दोन वर्षाचा तर दुसरा सहा महिन्याचा आहे. ग्रामस्थांनी दोन्ही मुलांना विष्णूनगर पोलिसांच्या हवाली केलं (Mother missing after releasing two young children into the bay).

लहान मुलांजवळ त्यांच्या आईचा मोबाईल सापडला आहे. काल घडलेल्या या घटनेनंतर आज ठाकूर्ली परिसरात राहणारा सुब्रोत साहू हा व्यक्ती पोलिसांसमोर आला. त्याने त्या दोन लहान मुलांचा वडील असल्याचा दावा केला आहे. त्याने पोलिसांची भेट घेतल्यानंतर तपासाला वेग आला आहे. मात्र, अद्यापही मुलांची आई बेपत्ता आहे.

वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय साबडे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तपास पथके तयार केले. या दोन चिमुकल्यांना सोडून आईने आत्महत्या केली का? असा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. महिलेचा मृतदेह किंवा ती सापडत नाही तोपर्यंत काहीच स्पष्ट होणार नाही.

दरम्यान, “लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. आर्थिक तंगीने आमच्यात थोडाफार वाद होत होता. ती असे पाऊल उचलेल असं मला वाटलं नव्हतं”, असं सुब्रोत साहू याने पोलिसांना सांगितलं (Mother missing after releasing two young children into the bay).

“सुब्रोत साहू हा व्यक्ती त्या दोन चिमुकल्यांचा वडील असल्याचे सांगितलं आहे. मात्र याबाबत चाौकशी सुरु आहे. तोच व्यक्ती मुलांचा वडील आहे का? याची कसून चौकशी सुरु आहे. महिला अद्याप बेपत्ता आहे. मात्र सुब्रोत याचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली. आर्थिक परिस्थिती खालावल्याने पती-पत्नीमध्ये वाद व्हायचा. पत्नी प्रिया इतक्या टोकाचे पाऊल उचलेल असे पती सुब्रोतला आजही वाटत नाही. आमच्या पद्धतीने प्रिया साहू हिचा शोध सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया विष्णूनगरचे पोलिस अधिकारी विक्रांत सोनवणे यांनी दिली. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस या प्रकरणावर जास्त बोलायला तयार नाही.

हेही वाचा : किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर गाडी घालून हत्या, पोलिसांनी तीन तासात आरोपींना ठोकल्या बेड्या