
Nepal Protest: नेपाळमध्ये आंदोलक आक्रमक झाले असून संसद भवन पेटवले आहे. तसेच अनेक मंत्र्यांची घरे जाळली आहेत. वाढता भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे. जनतेच्या रागामुळे केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते सध्या देशाबाहेर पळाले असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. खासदार संजय राऊत यांच्या ट्विटची चर्चा राजकारणात रंगली आहे.
आज नेपाळची राजधानी काठमांडूसह देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलकांनी राडा घातला. संतप्त जमावाने अर्थमंत्री विष्णू पौडेल यांचा पाठलाग केला आणि त्यांना रस्त्यावर पळवून-पळवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका वृत्तवाहिनीने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना मारहाण होत असलेल्या या व्हिडिओवर ट्विट करताना म्हटलं की, ‘ही घटना कोणत्याही देशात घडू शकते, सावध रहा. भारत माता की जय, वंदे मातरम्.’ राऊत यांच्या विधानाचा रोख दुसऱ्या कोणत्याही देशाकडे नसून भारताकडे आहे. भारतातही एखाद्या नेत्याला मारहाण होऊ शकते असं संजय राऊत यांना म्हणायचं आहे असं दिसत आहे.
ये हादसा किसी भी देश मे हो सकता है!
सावधान रहिये!
भारत माता की जय!
वंदे मातरम्!@BJP4India @nsitharaman @narendramodi https://t.co/aKNJL13QKf— Sanjay Raut (@rautsanjay61) September 9, 2025
विष्णू प्रसाद पौडेल हे नेपाळमधील महत्वाचे नेते आहेत, तसेच ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे उपाध्यक्ष आहेत. पौडेल हे मंत्रिमंडळात उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री होते. याआधीही त्यांनी अनेक वेळा महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली आहे. 2021 मध्ये ते उपपंतप्रधान होते आणि त्यांनी गृह मंत्रालय, उद्योग मंत्रालय, पाणी मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाचेही काम पाहिले आहे. ते याआधी 2020-2021 आणि 2015-16 अर्थमंत्री म्हणून काम केले आहे. तसेच 1994 -99, 2008-09 आणि 2021 मध्ये त्यांनी जल मंत्रालयाचा कार्यभार सांभाळलेला आहे.