Supriya Sule : व्हॉट इज प्रॉब्लेम, त्यांना विषय वाढवायचा असेल तर मला..रोहित पवारांच्या सुनेत्रा पवारांविषयीच्या वक्तव्यावरुन दोन्ही राष्ट्रवादीत वाद पेटला
Supriya Sule : रोहित पवारांनी काल सुनेत्रा पवार यांच्याबद्दल वक्तव्य केलं. 'सुनेत्रा वहिनींना अजितदादांसारखे काम येत नाही' असं मोठं विधान काल रोहित पवार यांनी केलं. त्या विरोधात आज अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन होणार आहे.

“पुण्याला कठोर पालकमंत्री देण्याची गरज आहे. सुनेत्रा वहिनींना अजितदादांसारखे काम येत नाही” असं मोठं विधान काल रोहित पवार यांनी केलं. त्या विरोधात आज अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, “काल रोहित पवारांनी जे वक्तव्य केलं. त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. एकदा रोहितने दिलगिरी व्यक्त केल्यावर, सॉरी म्हटल्यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून कोणाी आंदोलन करत असेल, तर माझी त्यांना विनंती आहे की, आपण एकाताटात जेवलो आहोत. त्यांच्यापर्यंत रोहितने सॉरी म्हटल्याची ही माहिती कोणी पोहोचवली नसेल” “मी अंतकरणापासून विनंती करते की, रोहितकडून काल अनावधनाने कमी-जास्त वाक्य गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त केली आहे. दिलगिरी व्यक्त केल्यावर विषय संपतो. त्यांची इच्छा असेल तर मी रोहितच्या वतीने त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी अंतकरणातून हात जोडून विनंती करते. हे पक्षाचं धोरण नाही. मी सॉरी म्हणते” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“आमचा असा कुठलाही हेतू नाही. रोहितने दिलगिरी व्यक्त केलीय. विषय वाढवायचा असेल तर मला विषय वाढवण्यात इंटरेस्ट नाही. व्हॉट इज प्रॉब्लेम. मी त्यांच्या भावनांचा आदर करते, सॉरी म्हणते. अजून काही हवं असेल तर मी ते ही करीन. सुनेत्रा पवार या अजित पवार माझ्या मोठ्या भावाची बायको आहे. ज्या संस्कारात पवारांच्या घरात मी वाढले, तिथे वयाने, पदाने मोठ्या असलेल्या कुठल्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करते. मला त्यात काही कमीपणा वाटत नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर काय म्हणाल्या?
डिलिमिटेशन विधेयकावरुन संजय राऊत यांनी तुमच्यावर टीका केली, त्या बद्दल सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. त्यावर त्या म्हणाल्या की, “सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. राऊत साहेब माझे मोठे भाऊ आहेत. महाराष्ट्राचे, देशाचे मोठे नेते आहेत. त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना जे वाटलं ते त्यांनी मोकळेपणाने लिहिलय” संसदेचं विशेष हिवाळी अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. त्यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, “सेशनचा अजेंडा अजून आलेला नाही. त्याबद्दल मी कसं बोलणार. ही लोकशाही आहे, लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. संजय राऊत माझ्यावर टीका करतात असं मला अजिबात वाटत नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.