Pune Accident : खेड्यातली लेक पुण्यात गेली, MPSCतून अधिकारी व्हायचं स्वप्न… पण सोनालीला बसनं चिरडलं, क्षणात सगळं बदललं
एमपीएससी करून अधिकारी होण्याचं स्वप्न, पण एका भीषण अपघाताने सगळं संपवलं. एसटी बसच्या धडकेत सोनालीचा नावाच्या विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताचा CCTV समोर आला असून अरुंद रस्ता आणि वाहतूक कोंडीचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.

सुनील ठिगळे, पुणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी: एमपीएससीची तयारी करून अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या 22 वर्षीय सोनाली कोळेकरचा एसटी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत झालेल्या या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सोनाली दुचाकीवरून जात असताना नेमकं काय घडलं आणि अपघातानंतर गंभीर आरोपही करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरजवळ एका भीषण अपघातात 22 वर्षीय एमपीएससी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सोनाली कोळेकरचा एसटी बसच्या धडकेत अंत झाला. वाफगाव-गुळाणी मार्गावरील राक्षेवाडी येथे घडलेल्या या अपघाताचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, समोर आलेल्या दृश्यांनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमका अपघात कसा घडला?
राक्षेवाडी परिसरातील रस्त्यावर वाहतुकीची गर्दी असताना दुचाकीस्वार एसटी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, गर्दीतून मार्ग काढताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्यावर घसरली आणि त्यावर मागे बसलेली सोनाली थेट एसटी बसच्या चाकाखाली आली. बसचे चाक तिच्या पोटावरून गेल्याने गंभीर अपघात झाला. या घटनेत सोनालीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर एसटी चालक आणि वाहक घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्ण
सोनाली कोळेकर ही मूळची खेड तालुक्यातील भोमाळे गावची रहिवासी होती. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचं स्वप्न तिने पाहिलं होतं. याच स्वप्नासाठी ती राक्षेवाडी येथे राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. मात्र, एका भीषण अपघाताने तिच्या आयुष्याचा प्रवास अचानक संपला. तिच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तिच्या स्वप्नांची कहाणी अधुरीच राहिली.
रस्त्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर
राक्षेवाडी परिसरातील अरुंद रस्ता, अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या समस्येमुळे वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतो. रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. सोनालीच्या अपघातानंतर रस्त्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.