वडिलांसोबत क्रूर वागला, काबूलच्या शिक्षकाला अपमानित केले, औरंगजेब याची माहिती नसलेली एक घटना

बादशहावर छाप पडून तो आपले मोठ्या प्रेमाने स्वागत करील आणि सढळ हाताने देणगी देईल, अशी त्याची कल्पना होती. पण, ती व्यक्ती जेव्हा औरंगजेब याच्या दरबारात पोहोचली तेव्हा आलमगीरने त्याची अशी फजिती केली की ती व्यक्ती मान खालून दरबारातून निघून गेली. त्यानंतर तो जो नाहीसा झाला त्याचे पुढे नावच ऐकू आले नाही.

वडिलांसोबत क्रूर वागला, काबूलच्या शिक्षकाला अपमानित केले, औरंगजेब याची माहिती नसलेली एक घटना
AURANGJEB AND MALIK SALEH 1Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 9:57 PM

मुंबई : दिल्लीच्या तख्तावर नवा बादशहा म्हणून आलमगीर औरंगजेब विराजमान झाला होता. सत्तेच्या लालसेपोटी त्याने आपल्या तिन्ही भावांना ठार मारले. वडील शहाजहान यांना आग्र्याच्या किल्ल्यात कैदेत ठेवले. मात्र, त्याचा फार मोठा फटका औरंगजेब याला बसला. मक्केच्या शरीफांनी त्याला भारताचा कायदेशीर शासक मानण्यास नकार दिला. अनेक वर्षं त्याने पाठवलेल्या भेटी मक्केत नाकारल्या जात होत्या. आलमगीर औरंगजेब याला गादी मिळाली. त्यानंतर त्याला येऊन भेटणाऱ्याची रीघ लागली होती. अनेक लोक दरबारात येऊन बादशहाला येऊन भेटत होते. त्याच्याकडून बक्षीस घेऊन जात होते. याच गर्दीत काबुलची एक व्यक्ती सामील झाली होती. औरंगजेब याची निवांत भेट घ्यावी या उद्देशाने ती व्यक्ती महिनाभर दिल्लीत राहिला. त्याने या काळात अमीर उमरावांच्या गाठी भेटी घेतल्या. आपल्या मतलबासाठी साह्य करण्याची त्याने त्यांना विनंती केली. या सर्वांच्या मदतीने बादशहावर छाप पडून तो आपले मोठ्या प्रेमाने स्वागत करील आणि सढळ हाताने देणगी देईल, अशी त्याची कल्पना होती. पण, ती व्यक्ती जेव्हा औरंगजेब याच्या दरबारात पोहोचली तेव्हा आलमगीरने त्याची अशी फजिती केली की ती व्यक्ती मान खालून दरबारातून निघून गेली. त्यानंतर तो जो नाहीसा झाला त्याचे पुढे नावच ऐकू आले नाही. औरंगजेब याच्या दरबारातून निघून गेलेली ती व्यक्ती होती मुहम्मद मलिक सालेह.

कोण होता मुहम्मद मलिक सालेह?

औरंगजेब याचे आजोबा जहांगीर याच्या दरबारात मीर अब्दुल्ला मुश्कीन कलाम हे उत्तम सुलेखनकार होते. त्यांचाच मुलगा म्हणजे मुहम्मद मलिक सालेह. ते पंजाबी मुस्लिम होते. मुहम्मद मलिक सालेह याने वडिलांचे गुण घेतले होते. ते ही सुलेखनकार होते या शिवाय त्यांनी इस्लाम धर्माचा कठोर अभ्यास केला होता. सम्राट शाहजहान याचे ते अधिकृत चरित्रकार होते. मुहम्मद मलिक सालेह यांनी अमल-इ सालीह हा ग्रंथ लिहिला. ज्याला शाहजहान नमाह (शाहजहानचा इतिहास) असेही संबोधले जाते. अमल-ए-सालीह मध्ये शाहजहानच्या जीवनाचे आणि राज्याचे वर्णन आहे. तसेच, शाहजहान यांचे वडील आणि आजोबा यांचे तसेच शाहजहान यांच्या समकालीन असलेले शेख, कवी आणि इतर विख्यात व्यक्तींची माहितीही आहे. 1659 ते 60 च्या दरम्यान हा ग्रंथ त्यांनी पूर्ण केला. शाहजहानने मुहम्मद मलिक सालेह याला मुलगा औरंगजेब याचा शिक्षक म्हणून नेमले होते. मुहम्मद सालेह यांनीच औरंगजेबाला इस्लाम धर्माची कठोर शिकवण दिली. एक प्रकारे ते त्याचे आध्यात्मिक गुरूच होते.

आलमगीर औरंगजेब याच्या भेटीसाठी निघाले…

औरंगजेब दिल्लीच्या गादीचा बादशहा झाल्याचे कळताच मुहम्मद मलिक सालेह त्याच्या भेटीसाठी निघाला. तरुण राजपुत्रांना शिकविताना शिक्षकांना किती त्रास होतो याची औरंगजेबाला जाणीव होईल. तो मोठ्या आनंदाने आपले स्वागत करेल आणि मोठी देणगी देईल या इनामाच्या आशेने मलिक सालेह घरातून निघाला. त्यावेळी तो शहाजहानने दिलेल्या वर्षासनावर काबुल येथे राहत होता. काही दिवसांच्या प्रवासानंतर तो दिल्लीला पोहोचला. पण, थेट औरंगजेब याची त्याने भेट घेतली नाही. नव्या राजवटीत काही महत्त्वाची कामे तातडीने करावयाची असतात. त्यामुळे औरंगजेब याला वेळ देणे आवश्यक आहे. त्या कामातून मोकळा होऊन बादशहा जरा विश्रांती घेऊ लागेल तेव्हा त्याला भेटावे, असा विचार करून त्याने दिल्लीत काही दिवस मुक्काम केला. या काळात त्याने अमीर, उमराव यांची भेट घेतली. दिल्ली दरबारी त्यांनी आपली मखलाशी करावी असे त्याला वाटत होते.

औरंगजेब याच्या कानावर मुल्लासालेह दिल्लीला आल्याची बातमी कळली होती. पण, त्याने मुद्दाम काही हालचाल केली नाही. तीन महिने होत आले होते. परंतु, बादशहाची काही भेट होत नव्हती. इकडे बादशहा औरंगजेब याच्या मनातही काही वेगळा विचार सुरु होता. आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी जे शिक्षक नेमायचे आहेत त्यांनी काय आणि कसे शिक्षण द्यावे, हे त्यांना सांगावे. त्याच अनुषंगाने मुल्लासालेह यांनाही समज द्यावी असा त्याचा विचार होता. याचे कारण म्हणजे वडील शहाजहान यांनी आपणासाठी चांगल्या शिक्षकाची योजना केलेली नव्हती, असे औरंगजेब याचे स्पष्ट मत होते.

औरंगजेब याची भेट झाली पण…

तीन महिने लोटल्यानंतर रोशनआरा बेगम यांच्या मध्यस्तीने अखेर मुल्लासालेह याला भेटीची वेळ मिळाली. बादशहाबरोबर होणाऱ्या मुलाखतीचा दिवस उजाडला. त्या भेटीवेळी न्यायशास्त्री, प्रमुख उमराव आणि बादशहाच्या मुलांचे शिक्षक या सर्वाना हजर राहाण्याचा हुकुम बादशाहने दिला. मुल्ला सालेहला हे ऐकून फार आनंद झाला. त्याला असे वाटले की, सर्वांसमोर आपला शिष्य बादशहा औरंगजेब आपणास आता मोठी देणगी देईल. तो दरबारात आला. रिवाजाप्रमाणे त्याने बादशाहाला मुजरा केला. तो काही बोलण्यास सुरवात करणार इतक्याच त्याचा शिष्य बादशहा औरंगजेब यानेच बोलण्यास सुरवात केली. पण, औरंगजेब याने मुल्लासालेह याला असे काही खडे बोल सुनावले की त्यामुळे मोठ्या देणगीच्या आशेने आलेल्या मुल्लासालेह याला अपमानित होऊन दरबारातून बाहेर पडावे लागले.

मुल्लासालेह याचा असा केला अपमान

मलिक सालेह याने दरबारात उपस्थिती लावली पण औरंगजेब याने स्वतःच आधीच बोलण्यास सुरवात केली. औरंगजेब म्हणाला, ”मुल्लाजी! ज्याला मुलगे आहेत अशा एखाद्या बादशहाचे, राजाचे आद्य कर्तव्य म्हणजे उत्तम निरोगी, सुदृढ दाई निवडून तिच्या स्तनपानाने मुलांची दुबळी शरीरे बळकट कशी होतील हे पाहणे! दाईच्या दुधावर पोसलेली मुले निरोगी, सुदृढ बनतील. पण, इतक्याने राजाची काळजी दूर होत नाही. दाई निवडताना जी काळजी घेतली जाते त्याहून कितीतरी अधिक काळजी राजपुत्रांना शिक्षक निवडताना घ्यावी लागते. मुलांची प्रकृती जशी दुधावर अवलंबून असते त्याचप्रमाणे त्यांचे बौद्धिक जीवन चांगल्या शिक्षणावर अवलंबून असते. शरीराहून त्याचे महत्व अधिक आहे. म्हणून सर्व राजे, सरदार त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता उत्तम शिक्षक मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मॅसिडोनियाच्या फिलिप राजाचा मुलगा अॅलेक्झांडर होतकरू होता. त्याच्या शिक्षणासाठी राजाने पंडित श्रेष्ठ ॲरिस्टॉटल याला दरबारात येऊन राहण्याची विनंती केली. गुरुच्या विद्येचा अॅलेक्झांडरला इतका लाभ झाला की, तो इतिहासातील सर्वश्रेष्ठ योद्धा म्हणून नाव करून गेला. एकंदरीत पाहाता, मुलांवर आईबापापेक्षा शिक्षकांचे ऋण अधिक होय, असे मला वाटते असे औरंगजेब याने स्पष्ट केले.

”सर्वश्रेष्ठ सालोमन याने आपल्या वडिलांकडून शिक्षण मिळविले. पण, त्याने परमेश्वराजवळ काय मागितले? संपत्ती आणि सत्ता? नाही.. त्याने परमेश्वराजवळ राज्यपालन करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि विवेकबुद्धि मागितली. त्याला माहित होते की ज्ञान नाही असा राजा काय कामाचा? ज्ञान नसेल तर न्याय नाही. न्याय नसेल तर प्रजेत शांतता नाही. विवेकबुद्धिने राज्यात समतोलपणा राहतो. राजाला आवश्यक असणाऱ्या सदगुणांची जोपासना आणि तीही त्या राजामध्ये निष्ठेने आणि जिव्हाळ्याने घडवून आणणे हे काम एक ज्ञानी पंडितच करू शकतो. असा पंडित शिक्षक म्हणून ज्याला लाभला त्याचे भाग्य काय वर्णावे!” सर्व दरबार शांत होऊन औरंगजेबाचे म्हणणे गांभीर्याने ऐकत होता.

मुल्लासालेह पण हाय! माझ्या कोवळ्या वयात, शिक्षणासाठी मुल्लाजी मला तुमच्या स्वाधीन केले गेले. त्याची आठवण झाली की मला अश्रू ढाळावे लागतात. कारण, आपण माझ्या कार्य क्षमतेकडे, स्वभावाकडे दुर्लक्ष केले. क्षुल्लक गोष्टी शिकवण्यात वेळ दवडलात. राजपुत्राला ज्या आवश्यक गोष्टी शिकविण्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले. ज्यांचा माझ्याशी संबंध नाही अशा किंवा पंडितांशी बोलताना शोभा म्हणून ज्यांचा उपयोग व्हावा अशा गोष्टी शिकविल्या. जगात प्राचीन काळी ॲसिरियन आणि पर्शियन इत्यादी लोकांची राज्ये होती. पूर्वी सिथियन जमातीचे लोक संख्येने थोडे होते. ते कातडी वस्त्रे वापरत, डोंगराळ भागात राहत. परंतु, तेच लोक आज तुर्क नावाने प्रख्यात झालेत. आशिया, आफ्रिका यावर सत्ता गाजवीत आहेत. या गोष्टी तुम्ही शिकविल्या नाहीत. युरोपियन फिरंगी यांनी अल्प साधनांवर तुर्कांच्या प्रबळ सत्तेशी टक्कर घेऊन त्यांना पराभूत केले. त्या युरोपियन फिरंग्यांच्या शौर्याच्या गोष्टी कधी सांगितल्या का? हिंदुस्तान आणि हिंदुस्तानचे बादशहा या पलीकडे तुम्हाला बाहेरील जगाचे ज्ञान नसावे. कारण, हिंदुस्तानच्या बाहेर जगात बादशहा असे नाहीतच. जे आहेत ते लहानसहान आणि क्षुल्लक असे राजे आहेत हे तुम्ही मला सांगितले. त्यांची सैन्ये, युद्धे, चालीरीती, शासनपद्धती, धर्म, व्यवहार याची माहिती दिली नाही. माझे पूर्वज आणि साम्राज्य संस्थापक नामवंत तैमूर आणि पराक्रमी बाबर यांच्याबद्दलही क्वचित अशी माहिती दिली. अरबी भाषेवर थोडेसे प्रभुत्व मिळण्यासाठीही दहा ते बारा वर्षे लागतात. ती भाषा शिकविण्यात माझा वेळ व्यर्थ घालविला. यात माझे तारुण्य आणि इतर उच्च हेतू पार पाडण्याची क्षमताही नाहिशी झाली, अशा शब्दात औरंगजेब याने मुल्लासालेह यांना सुनावले.

औरंगजेब यांनी पुढे मुल्लासालेह याला अपमानित करून म्हणाला, राजपुत्राला अशा पद्धतीने शिक्षण देण्यास तुम्हाला कोणी सांगितले? अरबी भाषेत शिकविण्यापेक्षा माझ्या मातृभाषेतून शिकविणे योग्य झाले नसते? मोगल राजपुत्रांच्या चालरीती शिकविणे हे तुमचे कर्तव्य नव्हते? एक दिवस मला माझ्या बंधूच्या विरुद्ध राज्य मिळविण्याकरिता नव्हे तर आत्मरक्षणाकरिता तलवार घेऊन लढावे लागणार आहे, हे सांगितले होते का? मित्र कसे जोडावे? किल्ल्यांना वेढे कसे द्यायचे? ते कसे जिंकायचे? निकराच्या लढाया कशा करायच्या हे शिकविले का? पण, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलेत. त्याचे कारण समजत नाही आणि त्याचा ठपका माझ्या पित्याच्या निष्काळजीपणावर की तुमच्या अज्ञानावर ठेवावा, हे मला समजत नाही.”

माझा पिता एखाद्या सुभ्यावर अधिकारी म्हणून मला पाठविण्याची शक्यता होती. त्या दृष्टीने राज्य कसे चालवावे? त्याच्या पद्धती तरी तुम्ही शिकवायला हव्या होत्या. न्यायदान कसे करावे, लोकांचे प्रेम संपादन करण्याचे मार्ग कोणते? सरदारांकडून गैरकारभार आणि मंत्र्यांकडून गैरकृत्ये होत असतील तर कोणत्या परिस्थितीत कडकपणा दाखवायचा. गैरव्यवस्था नाहिशी करण्याच्या योजना कोणत्या? याचे काहीच ज्ञान मला दिले नाही. तुम्ही माझी दिशाभूल केलीत. मी तुमचा काहीही देणे लागत नाही. माझ्या पिल्याने जे काही वर्षासन दिले आहे त्यावर आनंदाने गुजराण करा. पुनः माझ्या समोर येऊ नका. तुम्ही मला आयुष्यातील बराच काळ व्यर्थ दवडण्यास लावला. आजचा हा दिवस तुमच्यामुळे वाया गेला असे मी समजतो.” असे अखेरचे सांगत औरंगजेब याने आपलेच शिक्षक मलिक सालेह याची फजिती केली. एवढे बोलून औरंगजेब दरबारातून निघून गेला. दरबारात जमलेले सरदार चकित झाले तर, विद्वान पंडित, औरंगजेबाच्या मुलांचे शिक्षक बुचकळ्यात पडले. मुल्लासालेह याचा खूप भ्रमनिरास झाला. खाली मान घालून तो दरबारातून निघून गेला. तो जो नाहीसा झाला त्याचे पुढे नावच ऐकू आले नाही.

Non Stop LIVE Update
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.