
मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मध्य रेल्वे तसेच हार्बर आणि वेस्टर्न रेल्वे लाइनवरही दुरूस्तीच्या, देखाभालीच्या कामासाठी वेळोवेळी ब्लॉक घेण्यात येतो. कालच (रिवारी) मध्य रेल्वेच्या मार्गावर 5 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. आता रेल्वे प्रवाशांप्रमाणेच विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठीही एक महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे मार्गाप्रमाणेच आता विमानतळावरही ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येत्या 9 मे रोजी काही तास बंद ठेवण्यात येणार आहे. धावपट्टीची दुरूस्ती तसेच देखभालीच्या कामासाठी 9 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तब्बल 6 तास बंद ठेवले जाणार आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी, धावपट्टीच्या देखभालीसाठी विमावनतळावर हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे समजते. सहा तासांसाठी विमानतळ बंद राहिल्याने प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
कधी, केव्हा, बंद असेल विमानतळ ?
सर्वाधिक व्यस्त विमानतळ अशी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आहे. या विमानतळावरून दररोडज शेकडो विमानांचे लँडिंग आणि टेक-ऑफ होत असते. या विमानतळावरील 09/27 व 14/32 धावपट्ट्यांवरून देशांतर्गत आणि विदेशात विमानसेवा सुरु असते. मात्र पावसाळा अवघ्या 2 महिन्यांवर आला असून त्या काळातही विमानांचे सुरक्षित लँडिंग व टेक ऑफ व्हावे यासाठी धावपट्ट्यांचंया दुरूस्तीचे काम केले जाणार आहे.
दरवर्षीच हे काम हाती घेतले जाते. त्यामुळे यंदाही ब्लॉक घेऊन धावपट्टीची दुरूस्ती तसेच देखभालही केली जाणार आहे. यंदा 9 मे रोजी( शुक्रवार) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा 6 तासांसाठी बंद ठेवण्यात येणाप आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत 09/27 व 14/32 या दोन्ही धावपट्टय़ांवर देखभालीची कामे केली जाणार आहेत. दरम्यान या ब्लॉकची तसेच देखभालीचे काम करण्यात येणार असल्याची सूचना 6 महिने आधीच विमान चालकांना देण्यात आली आहे.
जेणेकरून विमानांचे वेळापत्रक व नियोजन योग्य प्रकारे होऊ शकेल, असे विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले. उड्डाणांचे वेळापत्रक बदलण्यासाठी आणि पर्यायी व्यवस्था करण्यासाठी विमान कंपन्यांना पुरेसा वेळ देण्यात आला आहे. तसेच प्रवाशांनाही या नियोजित ब्लॉकची माहिती देण्यात आली आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केल्याची माहिती देखील समोर आली आहे.