Mumbai AQI Update : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, हवेची गुणवत्ता सुधारली, आज AQI..

मुंबईची हवा गुणवत्ता सुधारून AQI 88 वर पोहोचला असून, दिवाळीतील प्रदूषणानंतर मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पण, दादर चौपाटीवर दिवाळीच्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. ‘आवाज फाउंडेशन’ने ध्वनी प्रदूषणावर चिंता व्यक्त करत, फटाक्यांवर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे, कारण उच्च ध्वनी पातळी आरोग्य आणि पर्यावरणासाठी हानिकारक आहे.

Mumbai AQI Update : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, हवेची गुणवत्ता सुधारली, आज AQI..
Mumbai AQI
| Updated on: Oct 24, 2025 | 8:43 AM

दिवाळीनिमित्त फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांपासून प्रचंड खालावली होती. मुंबईसह अनेक भागांत मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाल्याचे दिसून आले आणि त्यामुळेच सर्व मुंबईकर त्रस्त झाले होते. बाहेर पडताना मास्क लावून उतरण्याची वेळ अनेकांवर आली होती. मात्र आजचा दिवस मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेबाबत एक नवी अपेडट समोर आली आहे.

मागील अनेक दिवसापासून दूषित श्रेणीत असणाऱ्या हवेचा निर्देशांक हा आज मध्यम श्रेणीत आला आहे . आजचा मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अर्थात AQI हा 88 इतका आहे. त्यामुळे मुंबईची हवा ही धोकादायक श्रेणीमधून आता मध्यम श्रेणीत पोहचली आहे. दिवाळीतील फटाके आणि पोल्यूशन यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला आहे.गेल्या काही दिवसापासून मुंबईतील AQI कधी 100 पार तर काही दिवांपूर्वी तो 200 वर पोहोचला होता, मात्र आता AQI कमी झाला असून पहिल्यांदाच तो 88 वर आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचे दिसत आहे. तसेच दृष्यमानताही चांगल्या श्रेणीत पोहोचली आहे. मुंबईतील हवेतील धुराचं प्रमाण कमी झाल्याची माहिती महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाने दिली आहे.

हवेचा दर्जा सुधारला, पण कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी

दरम्यान मुंबईतील दूषित हवेचा दर्जा तर सुधारला आहे, मात्र दादर चौपाटीवर असलेल्या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. काल भाऊबीज झाली आणि दिवाळीचा सण संपला. सणानिमित्त फटाक्यांच्या अतिषबाजीने आसमंत फुलून गेला होता. मात्र त्याच फटाक्यांचे कागद, रॅपर्स, प्लास्टिक वगैरे,समुद्र चौपाटीवर जसेच्या तसे पडलेले आहेत. नेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आपणाला पाहायला मिळत आहेत, तर समूद्रातून वाहून आलेल्या कचऱ्यामुळेदेखील किनाऱ्यावर अस्वच्छता पसरली आहे. सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉक करणारे अनेक नागरिक तिथे येतात, पण आजूबाजूला असलेल्या कचऱ्याचे मुळे अस्वच्छ झालेल्या जागेवरच त्यांना व्यवयाम करावा लागत आहे. दिवाळी तर संपली आता मुंबई महापालिका हा कचरा कधी साफ करणार असा सवाल मुंबईकर विचारत आहेत.

‘आवाज फाउंडेशन’च्या उपक्रमात यंदा पावसामुळे खंड

दिवाळीतील फटाक्यांचा आवाज मोजणाऱ्या ‘आवाज फाउंडेशन’च्या उपक्रमात यंदा पावसामुळे खंड पडला आहे. मुंबईत गेल्या काही वर्षांपासून ‘आवाज फाउंडेशन’कडून दिवाळीदरम्यान ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण मोजले जाते. मात्र, यंदा पावसामुळे मोजणीवर परिणाम झाला. तरीदेखील, संस्थेने नागरिकांना ‘बिनआवाजी दिवाळी’ साजरी करण्याचे आवाहन केले.
कायद्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी २०२१ साली दिवाळीदरम्यान शहरातील सरासरी ध्वनीप्रदूषणाची नोंद ९०.५५ ते ९३.७८ डेसिबल इतकी केली होती. विक्रोळी पार्क परिसरात सर्वाधिक ९९.३५ डेसिबल, तर सर्वात कमी ७९.६७ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. ९९ डेसिबल म्हणजे रेल्वे इंजिनच्या आवाजाइतका आवाज!

आतीषबाजीवर निर्बंध घालावा
ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी राज्य सरकारने फटाक्यांच्या वापरावर निर्बंध आणावेत, अशी मागणी ‘आवाज फाउंडेशन’च्या संस्थापक सुमित्रा नायर यांनी केली. त्यांनी सांगितले की, “आपल्या कानांची क्षमता मर्यादित असते. 80 डेसिबलपेक्षा जास्त आवाज आरोग्यास हानिकारक ठरतो. दिवाळीत फटाक्यांमुळे हा आवाज १०० डेसिबलपेक्षा अधिक पोहोचतो.”

नोंद घ्यावी कारण?

•गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाचा स्तर वाढतो आहे.

•नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात.

•शाळांमधील लहान मुलांवर व वृद्धांवर परिणाम होतो.

•प्राण्यांनाही ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो.