लाडक्या बाप्पासाठी लगबग सुरू; दादरच्या फूल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी, 20 रुपयांचा झेंडू तब्बल…
लाडक्या बाप्पासाठी लगबग सुरू झाली आहे. दादरच्या फूल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी असून फुलांचे दर गगनाला भिडले आहेत.

गणेशोत्सव राज्यातील सर्वात मोठा उत्सव आहे. या गणेशोत्सवासाठी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. सणामुळे बाजारपेठा सजल्या आहेत. या गणेशोत्सवाला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. मायानगरी मुंबईतही बाप्पााच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. सार्वजनिक गणेश मंडळ मंडपात, घरात गणरायाच्या स्वागतासाठी सजावट, आरास, मखर करण्याची तयारी सुरू झाली आहे. या गणेशोतस्वाच्या पार्श्वभूमीवर दादरच्या फूल मार्केटमध्येही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
सणासुदीच्या काळात दादरमधील फूल मार्केट महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. या बाजारात रंगीबेरंगी फुलांच्या खरेदीसाठी गणेशभक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. गणरायासाठी मखर आणि आरास सजवण्यासाठी फुलांची गरज भासते. त्यामुळे बाजारात फुलांना मोठी मागणी असते. या दादर फूल मार्केटमध्ये सकाळपासूनच मुंबईकर आणि विक्रेत्यांची लगबग दिसून येते. परंतु यंदा फुलांच्या किंमती चांगल्याच तडकल्या आहेत. झेंडू ते शेवंतीची फुले महागली आहे. दादरच्या कॅस्टलिन परिसरात असलेल्या फूल मार्केटमध्ये भाविक जादा पैसे मोजून फूल खरेदी करू लागले आहेत.
भर पावसातही दादरच्या (Dadar) फूल मार्केटमध्ये फुलांच्या खरेदीसाठी तुडुंब गर्दी दिसून येत आहे. एकीकडे दादरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. तर दुसरीकडे बाजारात भाविकांची बाप्पााच्या स्वागतासाठी खरेदी सुरू आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने फुलांचे दरही दुप्पट झाले आहेत. २० रुपयांचे झेंडू आता ८० रुपयांवर पोहोचले आहेत. तर गुलाब आणि शेवंतीच्या फुलांचे दरही १०० पार पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी दादर फूल मार्केटवर पालिका प्रशासनाकडून अतिक्रमणाची कारवाई झाली होती. प्रशासनाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. त्यामुळे भविष्यातील कारवाईकडे विक्रेत्यांचं लक्ष लागलं आहे. खंरतर या मार्केटमध्ये सर्व सण-उत्सव आणि मंगळवारी फूल खरेदीसाठी प्रचंड गर्दी असते. या दादर फूल मार्केटचं धार्मिक आणि सणासुदीच्या वातावरणात विशेष महत्त्व असून लोक मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खरेदीसाठी येतात. त्यामुळे या बाजाराचे अस्तित्वासाठी प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.