Bhavesh Kawre : मी तर चिकन पिझ्झा खाताना व्हिडीओ बनवणारे – कावरेचा माज कायम

भावेश कावरेच्या 'मांसाहारींना घर नाही' या व्हायरल व्हिडिओने मुंबईत मोठा वाद निर्माण केला आहे. मुंबईची खरी ओळख सर्वसमावेशक असताना, कावरेच्या स्पष्टीकरणाने शाकाहारी मालकाची अट समोर आणली. पश्चाताप नसलेल्या त्याच्या पुढील खोचक विधानांनी भेदभावाचे मुद्दे तीव्र केला.

Bhavesh Kawre : मी तर चिकन पिझ्झा खाताना व्हिडीओ बनवणारे - कावरेचा माज कायम
भावेश कावरेच्या व्हिडीओने नवा वाद
| Updated on: Aug 13, 2026 | 2:28 PM

तुम्ही मांसाहार करत असाल, नॉनव्हेज खात असाल तर मुंबईतल्या ताडदेव भागामध्ये तुम्हाला घर मिळणार नाही, असा भावेश कावरे यांचा एक व्हिडीओ कालपासून फिरतोय. खरंतर मुंबई ही कोळी, आगरी बांधवांची, मराठी माणसांची तसेच सर्वसामान्यांचीही, सर्वांना सहज सामावून घेणारी, माणसा-माणसांत भेद न करणारी अशी खरी मुंबईची ओळख. मात्र इस्टेट एजंट भावेश कावरेचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून मुंबईत असा भेदभाव केला जातोय, तोही मराठी माणसाकडून, अशी प्रतिक्रिया येत आहे. कावरेचा हा व्हिडीओ पाहून डोक्यात अगदी तिडीक जाते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भावेश कावरे ताडदेव परिसरातील एका घराची माहिती देताना, मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी घर मिळणार नसल्याचे सांगताना दिसतात. केवळ व्यक्तीच्या खाण्याच्या सवयींवरून घर देण्यास नकार देणे योग्य आहे का, असा सवालही या प्रकरणानंतर उपस्थित केला जात आहे.

या वादावर कावरे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधत आपली बाजू मांडली. महाराष्ट्रात आणि मुंबईत मांसाहार करणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी शुद्ध शाकाहारी लोकही आहेत. मांसाहार न करणाऱ्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन हा व्हिडीओ तयार केल्याचे त्यांनी सांगितले. ज्या मालमत्तेचा व्हिडीओ त्यांनी बनवला, त्या घराच्या मालकाची शाकाहारी जीवनशैली असल्याचे कावरे यांनी स्पष्ट केले. मालक वारकरी असून त्यांची अशी इच्छा असल्याने शाकाहाराचा मुद्दा व्हिडीओमध्ये मांडल्याचा दावा त्यांनी केला.

कावरे यांनी कार्यालयातील जेवणाचे उदाहरण देत सांगितले की, एखादी व्यक्ती शाकाहारी असेल आणि तिच्यासमोर कोणी मांसाहारी पदार्थ आणले, तर ती व्यक्ती अनेकदा आपले टेबल बदलते. याच प्रकारच्या परिस्थितीचा मुद्दा आपण मांडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मी चिकन पिझ्झा खातानाही व्हिडीओ बनवणार

वाद निर्माण झाल्यानंतरही कावरे यांनी आपल्या विधानाबद्दल थेट दिलगिरी व्यक्त केलेली नाही. उलट, भविष्यात चिकन पिझ्झा खातानाचा व्हिडीओ बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सी-व्ह्यू असलेल्या घराची जाहिरात करताना ‘चिकन पिझ्झा खाताना सी-व्ह्यू पाहायचा असेल तर इथे घर घेऊ शकता’, असे म्हणणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मुंबईतील शुद्ध शाकाहारी हॉटेल्स केवळ व्हेज पदार्थच का विकतात, असा सवाल करत त्यांनी आपल्या विधानाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या व्हिडीओचा मुद्दाम गैरसमज केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मात्र, त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही वाद थांबलेला नाही. खाण्याच्या सवयींवरून एखाद्या व्यक्तीला घर नाकारणे हा वैयक्तिक पसंतीचा विषय नसून सामाजिक भेदभावाचा प्रकार असल्याची टीका केली जात आहे. विशेषतः मुंबईसारख्या बहुसांस्कृतिक शहरात अशा प्रकारच्या अटींवरून नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us