मुंबई लोकलमध्ये हे काय घडलं? तिकीट नसल्याने टीसीने लाथ घातली, ट्रेनमधून ढकललं? तक्रार समोर येताच…

मुंबईतील सचिन कुमार मौर्य नावाच्या प्रवाशाने रेल्वेच्या तिकीट तपासनीसावर (टीसी) गंभीर आरोप केले आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला धावत्या लोकलमधून लाथ मारून खाली पाडल्याचा दावा मौर्य यांनी केला आहे.

मुंबई लोकलमध्ये हे काय घडलं? तिकीट नसल्याने टीसीने लाथ घातली, ट्रेनमधून ढकललं? तक्रार समोर येताच...
mumbai local train
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 26, 2026 | 5:12 PM

Mumbai Local Train : लोकल ट्रेन ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये अनेक घटना घडल्या. पश्चिम रेल्वेमध्ये तर वाद झाल्याने थेट खून झाल्याचा प्रकार अलिकडेच घडला. लोकलमध्ये मारहाणीचे प्रकारही समोर आले आहेत. दरम्यान आता एका अजब प्रकारामुळे पुन्हा एकदा मुंबईची लोकल राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. एका प्रवाशाने टीसीने प्रवाशाला लाथ मारून धावत्या रेल्वेतून बाहेर काढल्याचा दावा केला आहे. याबाबत प्रवाशाने तक्रारही केली आहे. या तक्रारीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. प्रवाशाला लाथ मारून बाहेर काढल्याची तक्रार करणाऱ्या प्रवाशाचे नाव सचिन कुमार मौर्य असे आहे.

नेमकं काय घडलं

मुंबईतील सचिन कुमार मौर्य नावाच्या प्रवाशाने रेल्वेच्या तिकीट तपासनीसावर (टीसी) गंभीर आरोप केले आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला धावत्या लोकलमधून लाथ मारून खाली पाडल्याचा दावा मौर्य यांनी केला आहे. सचिन कुमार मौर्य यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा प्रकार २५ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मस्जिद बंदर स्थानकाजवळ घडला. मौर्य यांनी सांगितले की, ते लोकलमधून उतरत असताना एका टीसीकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीची चौकशी सुरू होती. संबंधित प्रवाशाकडे दंड भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचे समजल्यानंतर, टीसीने त्याला धावत्या गाडीतून लाथ मारून बाहेर ढकलल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे तो प्रवासी थेट रेल्वे रुळांवर पडल्याचेही त्यांनी नमूद केले.

रेल्वे प्रशासनाने नेमकं काय सांगितलं?

या घटनेनंतर मी २५ जुलै रोजी सकाळी ९.२६ वाजता रेल्वे हेल्पलाइन १५१२ वर तक्रार नोंदवल्याचेही मौर्य यांनी सांगितले. या आरोपांवर रेल्वे प्रशासनाने मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. रेल्वेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, संबंधित टीसीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, संशयित विनातिकीट प्रवाशाने टीसीला पाहताच डब्याच्या विरुद्ध बाजूने स्वतःच उडी मारली होती. त्यानंतर टीसीही तातडीने खाली उतरला. रेल्वे प्रशासनानुसार भायखळा रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) सीसीटीव्ही फुटेजमध्ये टीसी डब्यात चढताना दिसत आहे. मात्र, प्रवाशाला मारहाण केल्याचा किंवा धक्का दिल्याचा कोणताही पुरावा त्यामध्ये आढळत नाही. तसेच, टीसी अवघ्या चार ते पाच सेकंदांत डब्यातून खाली उतरल्याचे फुटेजमध्ये दिसत असून, इतक्या कमी वेळात डब्यात प्रवेश करून प्रवाशाला लाथ मारणे आणि पुन्हा खाली उतरणे शक्य नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us