
येत्या २९ ऑगस्टला मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे आणि सगेसोयरे अध्यादेश लागू करावा या प्रमुख मागण्यांसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोर्च्याची घोषणा केली आहे. यानुसार येत्या २९ ऑगस्टला मराठा समाजाने मुंबईत यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चावर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करून दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. या भूमिकेमुळे मुंबईतील गणेशोत्सवाचं वातावरण बिघडण्याची आणि दंगली भडकण्याची शक्यता आहे, अशी भीती हाके यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील गणेश उत्सवाचे वातावरण आहे, ते विस्कळीत करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु आहे. महाराष्ट्रातील लोक तिथं बोलवायचे. त्यामुळे गणेश उत्सवाला गालबोट लागू शकते. त्यांनी अशाच पद्धतीची वेळ निवडली आहे. ज्यावेळी लोक रस्त्यावर येतात, सण उत्सव असतो, त्याचवेळी त्यांनी टाइमिंग निवडलेला आहे, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
“हा लोकशाही देश आहे. तुम्ही कायदेशीर मार्गाने लढा, पण सामान्य जनतेला आणि सरकारला वेठीस धरणं चुकीचं आहे. तुम्ही कायदेशीर मागण्या मागव्यात कायदेशीररित्या लढाई लढावी, लोकशाही मार्गाने लढावं. पण सरकारला वेठीस धरुन, जनसामान्यांना वेठीस धरुन काय मिळणार आहे. जरांगे पाटील हे दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाला एकत्र आणण्यासाठी आम्ही ‘ओबीसी जोडो संघर्ष अभियान’ राबवत आहेत. यासाठी आम्ही गावोगावी जात आहोत, रात्री अपरात्री लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
यावेळी लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवारांनीच पाठिंबा दिला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. शरद पवार यांनी सुरू केलेल्या मंडल यात्रेवरही हाके यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. शरद पवार स्वतःला मंडल आयोगाचे जनक असल्याचं भासवतात, पण त्यांचा हा दावा खोटा आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.