
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचाराला देखील वेग आला असून, आरोप -प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती झाली आहे. आज मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची सभा झाली, या सभेमध्ये बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएम आणि दुबार मतदानाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुबार मतदार आला तर सकाळी सात वाजताच त्याला फोडून काढा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्हीच नसाल तुमचे अस्तित्व नसेल तर काय चाटायच्या आहेत महापालिका? आमच्या वचननाम्यात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, आम्ही उत्तम गोष्टी करू अरे पण त्यासाठी तुम्ही असले पाहिजे ना. तुमची काय किंमत करून ठेवली आहे? कोण महाराष्ट्रातील मराठी माणूस, पैसे फेकला की विकला जातो. ही बोली लावणारे कोण आमचेच, आमचेच लोकं त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमच्या लोकांना फोडत आहेत. ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची आहे. आज चुकला तर कायमचा मुकला. आज ही शहरं त्यांच्या हातात गेली तर उद्या राजाने मारलं आणि पावसाने झोडलं तर तक्रार कुणाकडे करायची? त्यामुळे हे सर्व सोडा, मराठी माणसासाठी एक व्हा, मुंबईसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा, असं आव्हान यावेळी राज ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, इतक्या वर्षाच्या तपश्चर्येने ही मुंबई मिळाली. १०७ हुतात्मे गेले. उद्या मुंबई गेल्यावर पुतळ्यांना काय अर्थ उरतो? पुतळे काय म्हणतील आमचा मराठी माणूस बेसावध राहिला. आम्हाला सत्ता मिळाली तर काय करू, सत्तेला लाथा आम्ही मारल्यात. या सत्ताधाऱ्यांना लाथ मारायच्या आहेत. बेसावध राहू नका, ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवा. सहा वाजता मतदान केंद्रावर जा. आपल्यात वाद नाही, खरी लढाई त्यांच्याशी आहे. आपण भांडत राहावं हेच त्यांना पाहिजे. त्यांना हवं ते द्यायचं नाही, आपल्याला हवं ते करायचं आहे. बेसावध राहू नका, सतर्क राहा, दुबार मतदार तिकडे आला तर सकाळी ७ वाजताच फोडून काढा, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं.