Rain Alert : पावसाने झोडपलं, कल्याण-डोंबिवलीकरांची परिस्थिती काय ? हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर शाळांना सुट्टी

महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे आणि लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि अनेक चाकरमान्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला आहे. शीळफाटा आणि शीळगाव सारख्या भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे.

Rain Alert : पावसाने झोडपलं, कल्याण-डोंबिवलीकरांची परिस्थिती काय ? हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर शाळांना सुट्टी
पावसाचे अपडेट्स
Image Credit source: social media
| Updated on: Aug 19, 2025 | 9:08 AM

Rain Updates : गेल्या तीन दविसांपासून महाराष्ट्रासह मुंबईला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी सकाळी देखील कायम आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईसह विविध भागांत पाणी साचलं असून लोकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत मार्गक्रमणा करावी लागत आहे. मुंबई व उपनगरांप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीतही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल दिवसभर पडल्यानंतर संध्याकाळी थोडा वेळ पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र रात्रीपासून पुन्हा सुरु झालेला पाऊस मंगळवारी सकाळीही कायम आहे.

या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू असून कल्याण-डोंबिवलीमध्येही पावसाची रिपरिप आहे. कालप्रमाणे पावसाचा जोर खूप नसला तरीही रात्रभर आणि आज सकाळीही पाऊस सतत कोसळत आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत-घटत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. याच दरम्यान भारतीय हवामान विभागाने देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला असून काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुण्यासह काही भागांना यलो अलर्ट देण्यात आला होता. आज पावसाचा जोर कमी असल्याने कल्याण-डोंबिवलीत पाणी साचलेले नसले तरी सखल भागात धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

शाळांना सुट्टी जाहीर

सातत्याने पडणार पाऊस आणि हवामान खात्याने दिलेला इशारा यानंतर पालिकेतर्फे आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काल, सोमवारी मुंबईसह अनेक भागात सकाळच्या सत्रात शाळा सुरू होत्या, मात्र दुपारच्या सुमारासा पावसाचा जोर वाढल्याने अनेक भागांत पाणी साचलं होतं. त्यामुळे अनेक शाळा लौकर सोडण्यात आल्या तर दुपारच्या सत्रात भरणाऱ्या शाळांना सुट्टीच जाहीर करण्यात आली. पावसामुळे अनेक शाळातूल विद्यार्थी, शिक्षक ठिकठिकाणी अडकून पडले होते, काही विद्यार्थी तर व्हॅनमध्ये, बसमध्ये भररस्त्यात अडकले होते, त्यांची सुखरूप सुटका करून नीट घरी पोहोचवण्यासाठी पोलिसांना,बचावपथकातील कार्यकर्त्यांना खूप मेहनत करावी लागली. याच घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवरच आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

चाकरमान्यांचं वर्क फ्रॉम होम

ठाणे जिल्ह्यात आणि मुंबई शहरात रात्रीपासून पावसाची रिपरीप सुरूचं आहे. पाऊस असूनही मध्य रेल्वेची लोकल सेवा ठीक सुरू असली तरीही कामावर जाणाऱ्या चाकरमानी वर्गाची संख्या कमी आहे. सोमवारी झालेल्या पावसाने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाल्याने काल प्रवासी वर्गाचे मोठे हाल झाले होते. त्यामुळे धडा शिकत अनेकांनी आज लोकलने प्रवास न करण्याचा आणि घरी राहूनच काम करण्याचा निर्णय घेतला.

आज देखील पुढील 24 तास महत्वाचे असून मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे चाकरमानी वर्गाने घरीचं राहण्याचं ठरवलं असून वर्क फ्रॉम होम सुरू केलं आहे.

दरम्यान शीळफाटा येथे लागून असलेल्या शिळ-दिवा रोडवर पाणी साचायला सुरवात झाली असून शीळगावात सुद्धा पाणी शिरले आहे. मात्र ठाणे महापालिका प्रशासना इथे दुर्लक्ष होत आहे, असे स्थानिक ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.