Mumbai Rain : पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई गुडघ्यावर; रस्ते झाले नद्या, ‘शक्तिमान’ ट्रकही हतबल!

मुंबईत मान्सूनचा जोर वाढला आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे या 'स्वप्ननगरी'चा वेग मंदावलेला दिसला. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये 90 ते 99 मिमी इतका प्रचंड पाऊस झाल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले.

Mumbai Rain : पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई गुडघ्यावर; रस्ते झाले नद्या, शक्तिमान ट्रकही हतबल!
पावसामुळे मुंबईची दाणादाण
Image Credit source: social media
| Updated on: Jul 02, 2026 | 12:35 PM

पावसाला आत्ता कुठे सुरूवात झाली असून पावसाने पुरेसा जोर धरण्याआधीच मुंबईची अवस्था बिकट झाली आहे. पहिल्या जोरदार पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही त्याच पावसाचा फटाकही मुंबईकरांना बसला. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आणि सतत धावणाऱ्या मुंबईचा वेग मंदावला. अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्त्यांचे रूपांतर तलावांत झालेलं दिसून आलं. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, रस्त्याच्या कडेला उभी असलेली काही वाहने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. एवढंच नव्हे तर ताकद आणि मजबुतीचे प्रतीक मानले जाणारे ‘शक्तिमान’ ट्रकही पाण्यात अडकल्यानंतर हतबल झाल्याचे चित्र दिसून आलं. काही लोकांनी पावसाचा आनंद लुटला असला, तरी त्याच वेळी या पावसामुळे शहराची जीर्ण झालेली जलनिस्सारण ​​यंत्रणा आणि प्रशासकीय तयारीतील अनेक त्रुटी यावेळी उघड झाल्या.

ट्रेन सेवा आणि विमानांच्या उड्डाणांवरही परिणाम

पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये 90 ते 99 मिमी इतक्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि उपनगरीय (लोकल) रेल्वे सेवा विस्कळीत झाली. दरम्यान, खराब हवामानामुळे मुंबईकडे येणाऱ्या तीन विमानांचा मार्ग बदलावा लागला; मात्र, नंतर ती सर्व विमाने सुरक्षितपणे मुंबईत परतल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.

मुसळधार पावसाचा अलर्ट

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याव्यतिरिक्त, विभागाने पालघर जिल्ह्यात आजसाठी, तसेच रायगड जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवसांसाठी मुसळधार पावसाबाबत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी नागरिकांना सुरक्षिततेचे आवाहन केलं. शहरात पुढील तीन तासांसाठी मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ लागू असल्याचे सांगत, अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा खबरदारी घेऊन सुरक्षित रहा, असा सल्ला त्यांनी सर्व नागरिकांना दिला.

 

या भागांत साचलं पाणी

दोन दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे अंधेरी सबवे, सांताक्रूझ, खार, वांद्रे, कुर्ला, विक्रोळी, पवई, घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड यांसारख्या सखल भागांत पाणी साचल्याचं समोर आलं. अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्यामुळे प्रशासनाला वाहतूक वळवावी लागली. तिथे अनेक गाड्या, रिक्षाही अडकून पडल्या होत्या. पावसाचं पाणी रस्त्यांवर साचल्यामुळे वाहनांचा वेगं मंदावला आणि त्यामुळे अनेक प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. मात्र या व्यत्ययांनंतरही सार्वजनिक वाहतूक सेवा सुरूच आहेत. मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवक लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. मात्र आता हळूहळू ही परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

झाडं पडण्याच्या 45 घटना; अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे, बीएमसीला (BMC) झाडे व फांद्या पडण्याबाबत 45 तक्रारी तर , शॉर्ट-सर्किटबाबत 7 आणि इमारतींचे काही भाग कोसळण्याबाबत 3 तक्रारी प्राप्त झाल्या. तर दोन दिवसाांपूर्वी चेंबूर भागात एक दुर्दैवी अपघात घडला होता, ज्यामध्ये चालत्या शालेय बसवर एक मोठे झाड कोसळले. या अपघातात 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि इतर चार विद्यार्थी जखमी झाले.

 

सतर्क रहा, सावध रहा

हवामान विभागाने पुढील 24 तासांत अधिक मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे शहरातील सखल भागांमधील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. प्रशासन सतर्क असून नागरिकांना सावध राहण्याचे, गरज नसेल तर बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us