Sanjay Raut | राज्यसभेची सहावी जागा आणि संभाजीराजे विषय आमच्यासाठी संपलाय! शिवसेनेचं हेच धोरण, संजय राऊतांचं प्रत्युत्तर

संभाजीराजेंविषयी आम्हाला प्रेम आहे. मात्र संभाजीराजे आणि राज्यसभेची सहावी जागा हा विषय़ आमच्यासाठी संपालाय. आम्हाला शब्दाला शब्द लावून वाद वाढवायचा नाहीये, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

Sanjay Raut | राज्यसभेची सहावी जागा आणि संभाजीराजे विषय आमच्यासाठी संपलाय! शिवसेनेचं हेच धोरण, संजय राऊतांचं प्रत्युत्तर
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 27, 2022 | 3:23 PM

मुंबईः राज्यसभेची सहावी जागा, त्यासाठीचा उमेदवार आणि संभाजीराजे (Sambhaji raje) हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. शिवसेना शिवसेनेच्या धोरणाप्रमाणेच वागली, असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलं आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यसभेच्या निवडणुकीतून (Rajyasabha Election) माघार घेतली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक लढवण्याची संभाजीराजेंची इच्छा होती. यासाठी त्यांनी सर्वपक्षांचा पाठिंबा हवा होता. मात्र शिवसेनेत आलात तरच पाठिंबा मिळेल आणि शिवसेनेकडून उमेदवारीही मिळेल, अशी अट शिवसेनेनं घातली होती. संभाजीराजेंनी शिवसेनेचा हा प्रस्ताव फेटाळून लावल्यामुळे शिवसेनेनं देखील संभाजीराजेंना पाठींबा न देता दुसरा उमेदवार उभा केला. मात्र या निर्णयासाठीच्या चर्चांदरम्यान, उद्धव ठाकरेंनी आपल्याला पाठिंबा देण्याचा शब्द दिला असताना तो पाळला नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलं.

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना शिवसेनेच्या धोरणांनुसार वागली. संभाजीराजेंविषयी आम्हाला प्रेम आहे. मात्र संभाजीराजे आणि राज्यसभेची सहावी जागा हा विषय़ आमच्यासाठी संपालाय. आम्हाला शब्दाला शब्द लावून वाद वाढवायचा नाहीये. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ही निवडणूक जिंकण्याची क्षमता महाविकास आघाडीत आहे.
उद्या छत्रपतींना परत राज्यसभेत यायचं असेल तरी त्यांना कोणत्या पक्षाचा आधार घ्यावेच लागेल. लोकसभा विधानसभाही लढायची असली तरीही त्यांना पक्षाचा आधार घ्यावाच लागणार आहे, असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलंय…

संभाजीराजेंचा आरोप काय?

छत्रपती संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे एक खासदार आणि मंत्री यांच्यादरम्यान काही बैठका झाल्या. त्यापैकी शेवटच्या बैठकीत मला शिवसेना पाठिंबा देण्याचे निश्चित झाले होते. त्यानंतर मी कोल्हापूरला निघालो असतानाच संजय पवारांच्या उमेदवारीच्या बातम्या सुरु झाल्या. मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही, असा आरोप संभाजीराजेंनी केला.

‘माघार नाही, स्वाभिमान जपला’

दरम्यान, राज्यसभा निवडणूक लढवायची नाही असा निर्णय जाहीर करताना संभाजीराजे म्हणाले, ही माघार नाही. पण माझा स्वाभिमान जपण्याचा मी प्रयत्न केला आहे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आता मी जनतेपर्यंत जाणार, त्यांच्याशी संवाद साधणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.