संघींना वाटलं गोळी मारून गांधींना संपवू… अभिजीत दीपकेंचा शिवाजी पार्कातून घणाघात
अभिजीत दीपके यांनी शिवाजी पार्कातून संघ, मोदींवर जोरदार हल्ला चढवला. गांधींना गोळी मारून संपवण्याचा विचार संघींना भारी पडेल, कारण गांधींचे विचार अमर आहेत. मोदी गांधी, नेहरू, आंबेडकरांच्या बरोबरीचे नाहीत. गांधी देशाचा आत्मा, आंबेडकर कणा, तर नेहरू ज्ञान आहेत. चहावाला आणि गरीब आईचा मुलगा असल्याचा दावा करत मोदींनी देशाचे नुकसान केले, अशी टीका दीपके यांनी केली.

गांधींना गोळी मारून गांधींना संपवू असं संघीना वाटलं होतं. पण गांधी मरत नसतात. इथे जमलेला प्रत्येकजण गांधी आहेत. जोपर्यंत या देशात आम्ही आहोत. तोपर्यंत गांधी जिवंत आहेत. गोडेस येतील, जातील. गोडसे भ्याड आहेत. हा देश गांधींच्या विचारावर टिकून आहे. गांधी नसते तर हा देश नसता. कितीही प्रयत्न करा. गांधींना तुम्ही संपवू शकत नाही, असा इशाराच अभिजीत दीपके यांनी दिला.
सीजेपीने शिवाजी पार्कात ग्यानू, मस्ट गो… आंदोलन पुकारलं होतं. यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना अभिजीत दीपके यांनी संघावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. एखादा महामानव येईल आणि म्हणेल मी नॉन बायोलॉजिकल आहे. सांगायची गरज नाही. तुम्ही पुरुषच नाही. ते स्वत:ची तुलना गांधी आणि नेहरूंशी करत आहेत. गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्यापेक्षा मोठं होण्याची तुमची औकात नाही. गांधी देशाचा आत्मा आहे. आंबेडकर देशाचा कणा आहे. तर नेहरू देशाचं ज्ञान आहे. तुम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही, असं अभिजीत दीपके यांनी ठणकावून सांगितलं.
यांना महापुरुष झाल्यासारखं वाटतंय
फक्त निवडणूक जिंकणं एवढंच यांचं काम आहे. निवडणुका जिंकून आम्ही गांधी, नेहरू आंबेडकरांपेक्षा मोठं होऊ असं यांना वाटतं. यांना या महापुरुषांचा संघर्ष माहीत नाही. जेव्हा लोकांना मतदानाचा अधिकार माहीत नव्हता, मतदान काय असतं? हे माहीत नव्हतं, लोकसभा, विधानसभा काय हे माहीत नव्हतं. तेव्हा नेहरू आणि आंबेडकारांनी त्यांना हे अधिकार दिले. इतकं महान कार्य या महापुरुषांनी केलं आहे. आणि दोन चार निवडणुका जिंकल्यावर यांना मात्र महापुरुष झाल्यासारखं वाटत आहे, असा हल्लाच दीपके यांनी चढवला.
चहा विकायला कुणी सांगितलं होतं?
यावेळी त्यांनी मोदींच्या चहा विकण्याच्या विधानाची खिल्ली उडवली. मोदी सारखं म्हणतात. मी चहा विकून इथपर्यंत आलो. तुम्हाला आम्ही चहा विकायला सांगितलं होतं का? शाळेत जायचं होतं ना? शिकायचं होतं. नोकरी करायची होती, असा टोला त्यांनी मोदींना लगावला.
आमच्या जीवावर परदेश दौरे
मी गरीब आईचा मुलगा आहे, असंही मोदी वारंवार सांगतात. तुम्ही गरीब आईचा मुलगा होतात म्हणून तुमच्यामुळेच देशातील मुलं गरीब झाली आहेत. तुमच्यामुळे सर्वजण गरीब झाले आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला. या देशाला धोरण नाहीत. देशाचा विकास कसा करायचा यांना माहीत नाही. यांना फक्त फॅशनचा सेन्स आहे. केवळ फॅशन केली जाते. आमच्या पैशाच्या जिवावर हे परदेश दौरे करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.