प्रत्येकी 100 वारकरी, 1.5 किमी पायी वारी, आषाढी वारीसाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर

| Updated on: Jun 15, 2021 | 11:49 PM

देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 व उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल.

प्रत्येकी 100 वारकरी, 1.5 किमी पायी वारी, आषाढी वारीसाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर
Ashadi Wari (फाईल फोटो)
Follow us on

मुंबई : यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 व उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत पंढरपूर येथील आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे. (Administration announces rules for Ashadi Wari, only 100 devotee allow for Paywari)

यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोव्हि-19 च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने निमावलीत नमूद केले आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे 1.5 किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पैार्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय महापूजा व विठ्ठल संतांच्या भेटीस गेल्यावर्षीप्रमाणे मान्यता देण्यात आली आहे. तर ‘श्रीं’चे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येईल. तर संत भानुदास महाराज यांच्या पुण्यतिथीसाठी 2+2 असे एकूण चार व्यक्तींच्या उपस्थितीत सध्या पद्धतीने साजरा करण्यास आणि विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक 1-15 व्यक्तींसह साध्या पद्धतीने साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ह. भ. प. गुरुदास महाराज देगलूरकरांचे चक्रीभवनसाठी ह. भ. प. देगलूकर महाराज व अन्य चार व्यक्ती असे एकूण पाच व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. ह. भ. प. अंमळनेरकर व ह. भ. प. कुकुरमुंडेकर महाराज यांच्यासोबत प्रत्येकी दोन व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.

रथोत्सवासाठी 10 मानकरी

महाद्वार काला उत्सवासाठी व संत नामदेव महाराज समाधी सोहळा 1 + 10 व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून व योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकादशीच्या दिवशींच्या रथोत्सवासाठी रथाऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी आणि मंदिर समितीचे पाच कर्मचारी अशा 15 व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून आणि योग्य ती खबरदारी घेऊन सोहळा साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मानाच्या पालखीसाठी 40 वारकऱ्यांना परवानगी

वारकरी संख्येच्या निकषानुसार संतांच्या पादुका भेटीसाठी, मानाच्या पालखीसाठी 40 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी दोन बस व प्रत्येकी बसमध्ये 20 प्रमाणे 40 संख्या निश्चित केली आहे. गोपाळकालासाठी मानाच्या पालखी सोहळयाला 1 + 10 या प्रमाणात गोपाळपूर येथे भजन व कीर्तनास परवानगी देण्यात आली आहे.

दशमी ते पैार्णिमा, 6 दिवस 2 व्यक्तींना परवानगी

संताचे नैवेद्य आणि पादुकांसाठी यावर्षी दशमी ते पैार्णिमा असे 6 दिवस 2 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. विठ्ठलाची प्रक्षाळपूजा समिती सदस्य यांच्या हस्ते सपत्नीक 2 + 3, रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा 2 + 3, श्री. विठ्ठलाकडे 11 पुजाऱ्यांकडून श्रीस रूद्राचा अभिषेक व श्री रूक्म‍िणिमातेस 11 पुजाऱ्यांकडून पवनमान अभिषेक करण्यास परवानगी देण्यात आली आहे

195 भाविकांना मुखदर्शनास परवानगी

आषाढी एकादशी दिवशी 20 जुलै 2021 रोजी स्थानिक महाराज अशा 195 मंडळींना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत त्यांना वेळ व प्रवेशपत्रिका देण्याबाबतची कार्यवाही मंदिर समितीने करायची आहे.

जुने निर्बंध कायम

यासोबतच गेल्यावर्षी मंदीर खुले करण्याबाबत जी स्थिती होती तीच कायम राहील. तसेच या सोहळ्यासाठी आयोजनाबाबत एखादी बाब राहून गेल्यास त्या बाबी संदर्भात मागील वर्षी जो निर्णय घेण्यात आला होता तोच निर्णय यंदाही घेण्यात यावा, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

संबंधित बातम्या

आषाढी वारीचा कार्यक्रम ठरला, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, वाखरीपासून दीड किमी पायी वारीला परवानगी

मानाच्या 10 पालख्यांना आषाढी वारीसाठी परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा

(Administration announces rules for Ashadi Wari, only 100 devotee allow for Paywari)