छठ पूजेचा वाद सुरु असताना बेस्टने 15-16 नोव्हेंबरसाठी घेतला एक खास निर्णय
Chhath Puja BEST: छटपूजेसाठी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यात येत आहे. भल्या पहाटेपासून भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याने त्याविरोधात मनसे आणि उद्धव सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी बेस्टने 15-16 नोव्हेंबरसाठी एक खास निर्णय घेतला आहे.

Chhath Puja BEST: छटपूजेची गाणी मुंबई लोकल स्टेशनवर मोठ्या आवाजात सार्वजनिक ध्वनिक्षेपकातून वाजवण्यात येत असल्याने संतापाची भावना आहे. रेल्वेच्या या मनमानी आवाजशाहीविरोधात मनसे आणि उद्धवसेनेने आवाज उठवला आहे. काही संतप्त प्रवाशांनी आणि नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला याविषयीचा जाब विचारला आहे. छटपूजेला विरोध नाही. तर या सांस्कृतिक दडपशाहीला विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा वाद ताजा असतानाच आता बेस्टने 15-16 नोव्हेंबरसाठी एक खास निर्णय घेतला आहे.
छठपूजेसाठी BEST कडून २२ जादा बसगाड्या; १५ आणि १६ नोव्हेंबरला विशेष बससेवा
मुंबईत छठपूजेसाठी समुद्रकिनारे, तलाव आणि चौपाट्यांवर जाणाऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन BEST प्रशासनाकडून विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. १५ आणि १६ नोव्हेंबर २०२६ रोजी एकूण २२ अतिरिक्त बसगाड्या चालवण्याची तयारी करण्यात आली आहे. रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी १५ जादा बसगाड्या सेवेत दाखल होणार आहे.
अशी आहे व्यवस्था
दुपारी २ वाजल्यापासून विशेष बससेवा सुरू होणार.
सांताक्रूझ पश्चिम, अंधेरी पश्चिम, मजास डेपो, मालवणी डेपो आणि बोरिवली पश्चिम येथून जुहू बीचकडे बसगाड्या धावणार
बसमार्ग क्रमांक २३१, २०३, ३३९, ए-२५६ आणि ए-२०३ या मार्गांवर अतिरिक्त बससेवेचे नियोजन
सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ७.३० दरम्यान ६ ते ७ अतिरिक्त बसगाड्या चालवल्या जाणार
जुहू बीच आणि जुहू बसस्थानक येथून सांताक्रूझ पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि बोरिवली पश्चिमकडे परतीची बससेवा उपलब्ध असेल.
जुहू बीच, दादर चौपाटी, पवई आणि गोराई खाडी परिसरात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन विशेष व्यवस्था.
बॅकबे, वरळी, सांताक्रूझ, ओशिवरा, मालवणी, गोराई, दिंडोशी, विक्रोळी आणि मुलुंड येथील डेपो व्यवस्थापकांना विशेष सूचना
‘महाराष्ट्रात पहिला मान मराठी भाषेला, मराठी माणसाला, बाकीचे नंतर!’
कल्याण पूर्वेत मनसेची बॅनरबाजी दिसून आली. भोजपुरी गाण्यांच्या वादानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. ‘महाराष्ट्रात पहिला मान मराठी भाषेला, मराठी माणसाला, बाकीचे नंतर!’ असा उल्लेख या बॅनरवर आहे. कल्याण पूर्वेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे स्थानकावर छटपूजेनिमित्त भोजपुरी गाणी लावल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले. भोजपुरी गाण्यांच्या वादानंतर आता कल्याण पूर्वेतील मनसेच्या बॅनरची चर्चा आहे. रेल्वे स्थानकावरील भोजपुरी गाण्यांच्या वादानंतर मनसेच्या या बॅनरबाजीमुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.