तब्बल 20 वर्षांनी अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग, सिद्धिविनायक, टिटवाळा, दगडूशेठ गणपती मंदिरात अलोट गर्दी

श्रावण महिन्यात २० वर्षांनी आलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणसह महाराष्ट्रातील विविध गणपती मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. टिटवाळा, दगडूशेठ हलवाई, रांजणगाव आणि राजूर येथील मंदिरांमध्ये दर्शनासाठी लांब रांगा लागल्या आहेत.

तब्बल 20 वर्षांनी अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग, सिद्धिविनायक, टिटवाळा, दगडूशेठ गणपती मंदिरात अलोट गर्दी
ganpati temple
| Updated on: Aug 12, 2025 | 2:30 PM

मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणसह राज्यभरातील विविध गणेश मंदिरांमध्ये आज अंगारकी संकष्टी चतुर्थीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. विशेषतः या वर्षी श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आल्याने भाविकांमध्ये अधिकच उत्साह संचारला आहे. तब्बल २० वर्षांनी श्रावण महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निमित्ताने बहुतांश गणपती मंदिरात पहाटेपासूनच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

 टिटवाळा गणपती मंदिरात गर्दी

कल्याणजवळील प्रसिद्ध टिटवाळा महागणपती मंदिरात पहाटे ४ वाजल्यापासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरात गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते. यावेळी भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन, पोलिस आणि स्वयंसेवकांनी विशेष व्यवस्था केली आहे. महापालिका आणि मंदिर प्रशासनाने एकत्र येऊन दर्शन व्यवस्था केली आहे. यावेळी भाविकांना पाणी, वैद्यकीय सुविधा यांसारख्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. महागणपती बाप्पाची आज फुलं, दुर्वा आणि आकर्षक लाईट्सने विशेष सजावट करण्यात आली आहे. अशा पवित्र आणि दुर्मिळ योगात बाप्पाचे दर्शन घेणे हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहे, अशी भावना अनेक भाविक व्यक्त करत आहेत. टिटवाळा महागणपतीच्या कृपेने सर्वांचे कष्ट दूर होवोत, अशी प्रार्थना आज हजारो भक्तांनी केली.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी

तर दुसरीकडे पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्येही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटेपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकर मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे बाजीराव रोड आणि शिवाजी रोड आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रांजणगाव आणि राजूरमध्येही भाविकांची गर्दी

अष्टविनायक मंदिरांपैकी एक असलेल्या रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरातही आज विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटे ५ वाजता महाभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. या ठिकाणी देवस्थान ट्रस्टने खिचडी प्रसाद आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.

जालना जिल्ह्यातील आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र राजूर येथेही अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. इथे दर्शनासाठी दोन ते अडीच किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे दर्शनसाठी चार ते पाच तास वेळ लागत आहे. संपूर्ण मराठवाड्यासह राज्यभरातून भाविक राजूरमध्ये दाखल झाले आहेत. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुमारे ७०० पोलीस कर्मचारी आणि २००० स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातही अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आज सकाळी ६ ते मध्यरात्रीपर्यंत मंदिराच्या आसपासचे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. अंगारकी चतुर्थी हा गणपती बाप्पाच्या उपासनेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यात यंदा श्रावणात अंगारकी चतुर्थी आल्याने दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे हा दिवस अधिकच खास ठरला आहे.