बुलडाण्यातील दलित कुटुंबावरील हल्ला अमानुष, हल्लेखोरांवर कारवाई करा; रामदास आठवलेंची मागणी

| Updated on: Jul 03, 2021 | 6:13 PM

खामगाव तालुक्यामधील चितोडा येथील रमेश हिवराळे या दलित तरुणावर झालेला हल्ला अमानुष होता, या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने निषेध नोंदवला आहे.

बुलडाण्यातील दलित कुटुंबावरील हल्ला अमानुष, हल्लेखोरांवर कारवाई करा; रामदास आठवलेंची मागणी
Ramdas Athavale
Follow us on

मुंबई : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील चितोडा येथील रमेश हिवराळे या दलित तरुणावर झालेला हल्ला अमानुष होता, या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने निषेध नोंदवला आहे. येथील सवर्ण समाजातील एका कुटुंबातील 10 जणांनी रमेश हिवराळे या दलित तरुणावर तलवार, गुप्ती, लाठी-काठीने मारुन जीवघेणा हल्ला केला होता. हा हल्ला अत्यंत अमानुष हल्ला होता, या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फ़े तीव्र निषेध करीत आहोत. हा अमानुष हल्ला करणाऱ्या आरोपींची पाठराखण करण्याची कोणीही भूमिका घेणे अत्यंत निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी लक्ष द्यावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. (Attack on Dalit family in Buldana Inhuman, take action against the attackers; Demand by Ramdas Athawale)

सदर हल्ल्यात रमेश हिवराळे गंभीर जखमी झाला असून त्यांच्या बहिणीच्या हाताची बोटे तुटली आहेत, तर त्याच्या आईच्या हातावर तलवारीचा वार झाला आहे. या प्रकरणी स्थानिक शिवसेना खासदार प्रताप जाधव तसेच बाजूच्या मतदारसंघातील बुलडाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी गावात भेट देऊन एकतर्फी चिथावणीखोर वक्तव्य केले असल्याची माहिती पुढे आली आहे. अ‍ॅट्रोसिटी गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित दलितांवर रॉबरी, चोरीचे खोटे गुन्हे दाखल करा, काही जास्त झाले तर मी 10 हजार जणांची फौज घेऊन येतो, शस्त्रास्त्र पुरवतो, असे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जाहीर चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. हे लिकप्रतिनिधीला शोभणारे वक्तव्य नाही. या वक्तव्याचा रिपाइंतर्फे आम्ही तीव्र निषेध करतो. त्यांच्या वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणीदेखील रिपाइंचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष नरहर गवई यांनी केली आहे. गावात दोन्ही समाजांनी शांतता ठेवण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

चितोडा येथील दलित अत्याचारप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चितोरिया यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधून रामदास आठवले यांनी याप्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. या प्रकरणी सर्व हल्लेखोरांवर कारवाई करावी, कोणत्याही निरपराधावर गुन्हा दाखल करू नये, याची काळजी घेण्याबाबत रामदास आठवले यांनी जिल्हा पोलस अधिक्षकांना सूचना केली आहे. तसेच गावात दोन्ही समाजात शांतता राखण्याबाबत सूचित केले.

संबंधित बातमी

‘ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज, 10 हजारांची फौज आणतो, शस्त्र पुरवतो’, शिवसेना आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

(Attack on Dalit family in Buldana Inhuman, take action against the attackers; Demand by Ramdas Athawale)