9 जुलैपासून रिक्षा चालक बेमुदत संपावर

भाडेवाढीसह इतर मागण्यांसाठी मुंबईसह राज्यातील रिक्षा चालक 9 जुलैपासून संपावर जाणार आहेत. या संपामध्ये एकूण 20 लाख रिक्षा चालक सहभागी होणार आहेत.

9 जुलैपासून रिक्षा चालक बेमुदत संपावर
| Edited By: | Updated on: Jul 07, 2019 | 1:39 PM

पुणे : भाडेवाढीसह इतर मागण्यांसाठी मुंबईसह राज्यातील रिक्षा चालक 9 जुलैपासून संपावर जाणार आहेत. या संपामध्ये एकूण 20 लाख रिक्षा चालक सहभागी होणार आहेत. मंगळवारपासून सर्व रिक्षा चालक काम थांबवणार आहेत. अशी माहिती ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.

रिक्षा चालकांनी अनेक मागण्या सरकारकडे केल्या आहेत. यामध्ये  परिवहन खात्याअंतर्गत रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी, रिक्षाचे मुक्त परवाने बंद करावे, रिक्षाच्या विमाचे वाढलेले दर कमी करावे, भाडेवाढ, अशा विविध मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या होत्या. पण सरकारने आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही बेमुदत संपावर जाण्याच निर्णय घेतला आहे, असं कांबळे म्हणाले.

मुंबई, पुण्यात मोठ्या प्रमाणात चाकरमनी ऑटो रिक्षाचा वापर करतो. पण रिक्षा चालकांच्या संपामुळे याचा थेट परिणाम प्रवाशांवर होणार आहे. तब्बल 20 लाख रिक्षा चालक या संपात सहभागी होणार आहेत. यामुळे सरकार आता यावर काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे आहे.