रजा अकादमीवर बंदी घाला, नाही तर आम्ही त्यांना संपवू, महाराष्ट्रातल्या दंगलीवर राणेंचा इशारा

| Updated on: Nov 13, 2021 | 9:23 AM

रजा अकादमीची स्थापना 1978 साली अलहाज मोहम्मद सईद नुरी यांनी केलीय. मुस्लिम विचारवंतांची विशेषत: सुन्नी स्कॉलर्सची पुस्तकं प्रकाशित करण्याचं काम अकादमी करते. आतापर्यंत शेकडो पुस्तकं रजा अकादमीनं अरेबिक, हिंदी आणि इंग्लिशमध्ये प्रकाशित केलीत.

रजा अकादमीवर बंदी घाला, नाही तर आम्ही त्यांना संपवू, महाराष्ट्रातल्या दंगलीवर राणेंचा इशारा
मुस्लिम आंदोलनातील हिंसाचारावरुन नितेश राणेंचा सरकारला इशारा
Follow us on

महाराष्ट्राच्या काही शहरामध्ये काल दंगलसदृश्य स्थिती होती. ह्या सर्व घटनेच्या पाठीमागे रजा अकादमी असून तिच्यावर बंदी घाला, नाही तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू असा इशारा भाजपा नेते नितेश राणे यांनी दिलाय. राणे यांनी ट्विट करत हा इशारा दिला आहे. नितेश राणे हे सध्या आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कालच एसटी कामगारांच्या संपावरुनही सरकारला विशेषत: परिवहन मंत्री परबांना चांगलंच खडसावलं होतं. त्यानंतर त्यांच्या टार्गेटवर आता रजा अकादमी असल्याचं दिसतंय?

नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
भाजप नेते नितेश राणे यांनी सकाळी ट्विट करत सरकार तसच रजा अकादमीला टार्गेट केलंय. ते ट्विटमध्ये म्हणतात- ‘महाराष्ट्राच्या विविध भागात जी हिंसा आणि दंगल उसळली त्याच्या पाठीमागे अतिरेकी संघटना रजा अकादमीच आहे. प्रत्येक वेळेस ते शांतता भंग करतात, सर्व नियम पायदळी तुडवतात आणि सरकार बसून राहतं, बघत बसतं. सरकारनं एक तर यांच्यावर बंदी घालावी अन्यथा, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू’.

नेमकं काय घडलं वेगवेगळ्या शहरात?
त्रिपुरामध्ये जमावानं मशिद पेटवल्याची अफवा महाराष्ट्रात पसरली. त्याच्या निषेधार्थ काल विविध ठिकाणी मुस्लिम मोर्चे काढले गेले. त्यात अमरावती, नांदेड, भिवंडीत जमाव हिंसक झाला. अमरावतीत तर जमावानं 20-20 दुकानं फोडली, दुचाकी तोडल्या. पोलीसांवर दगडफेक केली. बघता बघता महाराष्ट्राच्या काही शहरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. भिवंडी-नांदेडमध्ये रजा अकादमीच्याच काही तरुणांनी कायदा हातात घेऊन दगडफेक केल्याचा आरोप आहे. नांदेडच्या एसपींनी ह्या घटनेला दुजोरा दिलाय.

काय म्हणाले नांदेडचे एसपी?
नांदेडमध्येही मुस्लिम मोर्चा हिंसक झाला. त्यावर बोलताना नांदेडचे एसपी प्रमोदकुमार शेवाळे म्हणाले, ‘नांदेडमध्ये रजा अकादमीनं प्रोटेस्टचं आयोजन केलं होतं. त्यातले काही तरुण मिक्स लोकसंख्या असलेल्या रहिवाशी भागात जायला निघाले. पोलीसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी दगडफेक केली. त्यानंतर मग पोलीसांनी त्यांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. शहरात हे तीन ते 4 ठिकाणी असं घडलं’.

काय आहे रजा अकादमी?
रजा अकादमीचं जेव्हा जेव्हा नाव निघतं तेव्हा तेव्हा मुंबईतल्या आझाद मैदानावर केलेली हिंसा डोळ्यासमोर येते. ही घटना होती 11 ऑगस्ट 2012 ची. आसाम आणि म्यानमारमध्ये झालेल्या मुस्लिमांवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ रजा अकादमीनं मुंबईतल्या आझाद मैदानावर धरणे धरले. पण बघता बघता जमाव हिंसक झाला आणि प्रचंड जाळपोळ, तोडफोड केली गेली. यात महिला पोलीसांवरही हात टाकल्याचे आरोप झाले. त्यानंतर रजा अकादमी दर काही काळानंतर मुस्लिमांच्या विविध प्रश्नावर अशीच आंदोलनं करते. आणि त्यातल्याच काही आंदोलन हिंसा उसळलीय. ह्या रजा अकादमीची स्थापना 1978 साली अलहाज मोहम्मद सईद नुरी यांनी केलीय. मुस्लिम विचारवंतांची विशेषत: सुन्नी स्कॉलर्सची पुस्तकं प्रकाशित करण्याचं काम अकादमी करते. आतापर्यंत शेकडो पुस्तकं रजा अकादमीनं अरेबिक, हिंदी आणि इंग्लिशमध्ये प्रकाशित केलीत.

हे सुद्धा वाचा-
नागपूर शहराचे प्रदूषण पोहचले 90 डेसिबलपर्यंत, नीरीने 676 स्वयंसेवकांसोबत गोळा केला डाटा

राशीचक्रातील 4 राशींच्या व्यक्ती यशाची शिखरं चढतात,आयुष्यात पैशांची कधीच कमी भासत नाही!

VIDEO | फोटोग्राफरला प्री-वेडिंग शूट पडले महागात, चोरट्यांकडून गाडीच्या काचा फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास